Join us  

द केरळ स्टोरी: लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा सिनेमा? तिखट शब्दांत निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 1:02 PM

The kerala story: या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचं म्हणत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

सुदीप्तो सेन यांचा द केरळ स्टोरी हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय आणि काँग्रेससह इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) च्या युवा लीगने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचं म्हणत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. याविषयी चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'द केरळ स्टोरी' या सिनेमाचा अलिकडेच ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यावर अनेकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. इतकंच नाही तर येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमावर बंदी घालण्यात यावी ही मागणी जोर धरू लागली आहे.

"केरळची ही कथा एका मुलीच्या सत्यघटनेवर आधारित आहे. जी धर्म परिवर्तन करुन सीरियाला जात होती. परंतु, तिला तिची चूक समजली आणि ती अर्ध्या वाटेतून परत पळून आली. आज ती अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहे. अफगाणिस्तानच्या तुरुंगात अशा अनेक मुली आहेत. या गोष्टीची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही त्या दिशेने शोध सुरु केला. त्यातून ही कथा जन्माला आली आहे. आम्ही चित्रपटात अशा तीन मुलींची कथा घेतली आहे ज्या या धर्मांतराला बळी पडतात आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते",असं विपुल शाह म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "जेव्हा आम्ही याविषयी संशोधन करत होतो. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हा आकडा प्रत्यक्षात खूप मोठा आहे. यासंदर्भात आम्ही किमान १०० पेक्षा जास्त मुलींना भेटलो. हा मुद्दा खरंच मांडण्यासारखा आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्यपरिस्थिती सांगायचा प्रयत्न केला आहे."दरम्यान, 'हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो का?' असा प्रश्न विपुल शाह यांना विचारण्यात आला, त्यावर ''हे लोकांनी तयार केलेले राजकीय शब्द आहेत. आमचा सिनेमा पीडित मुलींच्या जीवनावर आधारित आहे. आम्ही सत्य दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आता त्यासाठी तुम्हाला कोणता शब्द निवडायचा हा तुमचा निर्णय आहे.''

दरम्यान, 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची कथा चार महिलांभोवती फिरताना दिसते. या हिंदू महिलांना मुस्लीम बनवलं जातं आणि पुढे त्या आहे दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होतात. चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळमधील 32 हजार महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आलं आहे. ज्यानंतर या सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीअदा खान