ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूडचा बहुचर्चित "जग्गा जासूस" या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर कळविण्यात आली आहे. सुरुवातीला "जग्गा जासूस" 7 एप्रिल 2017 ला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
रॉकस्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी "जग्गा जासूस" मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कतरिना कैफ हिने आपल्या इन्साग्राम अकाउंटवर जग्गा जासूस चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख पोस्ट केली आहे. पोस्ट केलेल्या नवीन पोस्टरमध्ये कतरिना आणि रनबीर कपूर एका होडीवर जात असल्याचे दिसत आहे.
अनुराग बसू दिग्दर्शित "जग्गा जासूस" चित्रपटामध्ये रणबीर कपूर टीनेजरच्या भूमिकेत आहे, जो आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. तर कतरिना कैफ 22 वर्षांच्या एका तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर सारख्याच वयाच्या भूमिका साकारणाऱ्या रणबीर आणि कतरिना या जोडप्याला अशा वेगळ्या भूमिकांत पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.