मुंबई - आज सिनेमागृहांमध्ये एकीकडे नवीन अॅक्शनपटांची धूम आहे, तर दुसरीकडे जुने गाजलेले संगीतप्रधान रोमँटिक सिनेमेही रसिकांचे मनोरंजन करत आहेत. ब्लॅाकबस्टर जुने चित्रपट प्रेक्षकांना खुणावत असल्याने मल्टिप्लेक्ससाठी हे गणित फायद्याचे ठरत आहे. १९९५मध्ये रिलीज झालेला दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' हा सिनेमा २८ वर्षे होत आली तरी आजही मराठा मंदिर सिनेमागृहात दररोज दाखवला जात आहे.
ड्रेस सर्कलचे तिकिट ३० रुपये आणि बाल्कनीचे ४० रुपये असल्याने आजही प्रेक्षक हा चित्रपट वारंवार पाहात आहेत. मराठा मंदिरखेरीज सीवूड्समधील सिनेपोलीसमध्येही या चित्रपटाचा दुपारी एक शो आहे. पीव्हीआर आयनॅाक्समध्येही असेच काही गाजलेले संगीतप्रधान सिनेमे सुरू आहेत. यात शाहिद कपूर आाणि करीना कपूरचा गाजलेला 'जब वी मेट', शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांचा 'मोहब्बतें', रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटांचा समावेष आहे. हे चित्रपट प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये जाऊन पाहात आहेत.
याखेरीज जानेवारीमध्ये यशराजने शाहरुखच्या 'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'चक दे इंडिया' हे चित्रपट पुर्नप्रदर्शित केले होते. यामुळे रोमँटिक सिनेमांच्या चाहत्यांना पुन्हा आपल्या आवडीचे चित्रपट पाहण्याची संधी मिळत आहे. हे सिनेमे पाहणाऱ्यांमध्ये प्रेमवीरांची संख्याही मोठी आहे. गाजलेल्या लव्हस्टोरीज पुन्हा पुन: पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या एका मोठ्या वर्गाला अॅक्शनपटांच्या लाटेमध्ये हे चित्रपट खुणावत आहेत. मुंबईसह सूरत, पुणे, अहमदाबाद, ग्वाल्हेर, बंगलूरूसारख्या मोठ्या शहारांमध्ये हे सिनेमे पाहिले जात आहेत.
परवडणारे तिकिट दरया सिनेमांचे तिकिट सर्वसामान्यांना परवडणारे असते. कमीत कमी ११२ रुपयांपासून जास्तीत जास्त २५० रुपये तिकिट असते. काही शो ८० टक्क्यांपर्यंत फुल होतात.
वेळोवेळी पुर्नप्रदर्शितया सिनेमांखेरीज हिंदी सिनेसृष्टीत माईल स्टोन ठरलेले विविध विषयांवरील चित्रपट वेळोवेळी पुर्नप्रदर्शित केले जातात. सुभाष घई दिग्दर्शित 'कर्मा' हा मल्टिस्टारर चित्रपट या महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण भारतात जवळपास ४५ सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता.
दुहेरी फायदाकल्ट-क्लासिकच्या यादीतील 'वीर जारा' तसेच 'हम आपके है कौन?'सारखे आणखी काही चित्रपट वारंवार पुर्नप्रदर्शित केले जातात. गाजलेल्या चित्रपटांचा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आनंद लुटता यावा आणि सिनेमागृहांचाही फायदा व्हावा हे गणित असते.
सध्या सुरू असलेल्या जुन्या चित्रपटांमध्ये बरेचसे एव्हरग्रीन रोमँटिक सिनेमे आहेत. 'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधत असे सिनेमे पुन्हा रिलीज केले जातात. जेव्हा कधी एखादा आठवडा नवीन चित्रपट नसतो, तेव्हाही कल्ट सिनेमे रिलीज केले जातात. चांगले कलेक्शन होत असल्याचा सिनेमागृहांना फायदा होतो. खाद्यपदार्थांची विक्रीही होते. हे चित्रपट ज्यांनी सिनेमागृहात पाहिले नाहीत अशांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव देण्याचाही प्रयत्न असतो.- मुरली चटवाणी (मॅनेजिंग पार्टनर, पॅनोरमा स्टुडिओज - डिस्ट्रीब्युशन)