Join us  

'मास्टरशेफ' फेम कुणाल कपूरचा घटस्फोट; १६ वर्षांचा संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:26 AM

शेफ कुणाल कपूरने पत्नीपासून घेतला घटस्फोट, लग्नानंतर १६ वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय

'मास्टरशेफ ऑफ इंडिया' या टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमातून शेफ कुणाल कपूरला एक नवी ओळख मिळाली. या शोमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. कुणालचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नव्यानव्या रेसिपींचे व्हिडिओ तो चाहत्यांना शेअर करत असतो. प्रेक्षकांना खमंग रेसिपी पुरविणाऱ्या कुणाल कपूरच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कुणालचा घटस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली हायकोर्टाने कुणालच्या घटस्फोटाच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. 

पत्नीची क्रूरता आणि जाचाला कंटाळून शेफ कुणाला कपूरने तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी(२ एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयाने कुणाल कपूरचा अर्ज मंजूर करत त्याला घटस्फोट दिला आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल कृ्ष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीच्या क्रूरतेमुळे कुणाल कपूरच्या घटस्फोटास मान्यता दिली. "कुणाल कपूर यांच्या पत्नीची त्यांच्याप्रती सहानुभूती वागणूक नाही. जेव्हा जोडीदाराप्रती असा स्वभाव असतो तेव्हा लग्न या गोष्टीचा अपमान होतो. त्यामुळे जाच सहन करत जोडीदाराबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्यांना सांगू शकत नाही. कौटुंबिक न्यायालयाने कुणाल कपूरची घटस्फोटाची याचिका फेटाळून चूक केली आहे," असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

कुणाल कपूरने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, कौटुंबिक न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुणालने २००८मध्ये लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याला एक मुलगादेखील आहे. २०१५ पासून कुणाल पत्नीपासून वेगळं राहत होता. तेव्हापासून त्याचा मुलगाही पत्नीबरोबरच राहत आहे. 

टॅग्स :कुणाल कपूरघटस्फोटसेलिब्रिटी