Join us  

निसर्गरम्य वातावरण अन् 'ती' हक्काची बोट, मित्रांच्या साथीने अवधूत गुप्तेचं स्वप्न झालं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 9:28 AM

मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं..

प्रसिद्ध मराठी संगितकार अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) नुकताच शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आहे. अवधूतचं अनेक वर्षांपासूनचं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालंय. यामध्ये त्याला स्वप्नील बांदोडकर आणि अजित परब या दोन मित्रांची साथ लाभली. तासनतास पाण्याकडे बघणाऱ्या अवधूतला पाण्याच्या आणखी जवळ जायची इच्छा होती. म्हणूनच त्याने हक्काची बोटच घेतली आहे. सुंदर व्हिडिओ पोस्ट करत त्याने आपल्या स्वप्नपूर्तीचं वर्णन केलंय. 

काय आहे अवधूतची पोस्ट?

'दरवर्षी धरण भरलं की पाणी गळाभेट घ्यायला आल्यासारखं डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि मी सुद्धा पाय बुचकळून तासनतास बसायचो! दरवर्षी मनात यायचं की ह्यापेक्षा जास्त जवळ जायला हवं त्याच्या.. पण त्यासाठी स्वतःची बोट हसायला हवी. मनात आलं, की टाकली पाण्यात आणि सुरुवात केली वल्हवायला! मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं..झालं!! त्यातलं हे एक पूर्ण केलं!!! ते सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब सारख्या मित्रांच्या साथीनं..'

व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ऐकू येणारी कविताही खूप छान आहे. बोटीत हवा भरण्यापासून ती पाण्यात जाऊन वल्हवण्यापर्यंत आणि पाण्यात मस्त डुंबण्याचा आनंद घेतानाचा हा व्हिडिओ आहे. अवधूतचा हा व्हिडिओ खूपच आयुष्यात नवा दृष्टिकोन देणारा आहे. स्वप्नील बांदोडकर बोट वल्हवताना दिसतोय तर अवधूत पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहे. भोरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी हा व्हिडिओ शूट केलाय. नेटकऱ्यांनी 'क्या बात है' म्हणत अवधूतचं अभिनंदन केलंय. मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना अशी छोटी स्वप्नंही पूर्ण करायची असतात हे अवधूतने दाखवून दिलंय.

टॅग्स :अवधुत गुप्ते स्वप्निल बांदोडकरसोशल मीडिया