राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट ज्युरी’ पुरस्कारावर मोहोर उमटवीत, ‘ख्वाडा’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी महाराष्ट्राच्या मातीतला चित्रपट देऊन राज्याच्या ग्रामीण भागाची नोंद दिल्ली दरबारी घेण्यास लावली, तेव्हापासून सतत चर्चेत असणारा हा चित्रपट २२ आॅक्टोबर रोजी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते चंद्रशेखर मोरे, अभिनेते भाऊसाहेब शिंदे, अनिल नगरकर व अभिनेत्री रसिका चव्हाण या ‘ख्वाडा’च्या चमूने ‘लोकमत’ मुंबई कार्यालयाला भेट दिली.चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता चंद्रशेखर मोरे म्हणाले, ‘हा चित्रपट ‘स्थलांतर’ या विषयावर आधारित आहे. पुणे स्टेशनवर उभे असताना तिथे आलेल्या विदर्भ-मराठवाड्यातल्या काही लोकांना बघून भाऊरावांना या चित्रपटाची कथा सुचली. ही शेतकरी मंडळी होती. पाण्याअभावी शेती करता येत नसल्याने, पुण्या-मुंबईकडे जात असल्याचे त्यांनी भाऊरावांना सांगितले. ही गोष्ट त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली आणि त्यातून ‘स्थलांतर’ या विषयावर चित्रपट करण्याचे त्यांनी ठरवले, पण असे सगळे असले, तरी ही मनोरंजन करणारी मसाला फिल्म आहे. जेव्हा मी ही फिल्म पहिल्यांदा पाहिली, तेव्हाच ती मला आवडली. हातात काही नसताना सर्व काही पणाला लावून भाऊरावांनी हा चित्रपट केला, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी हा चित्रपट प्रेझेंट करायचा, असे पक्के ठरवले. हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.’या चित्रपटात भूमिका करायला मिळाली याचा खूप आनंद होतोय. रांगडा, मनमिळाऊ, लाजरा, स्वप्नाळू अशा तरुणाची ही भूमिका आहे. त्याला व्यायामाची, कुस्तीची आवड आहे. त्याची भाषा हे एक वेगळेपण आहे. एखादी शिवी दिल्याशिवाय वाक्य पूर्णच होत नाही आणि ती भाषा पोहोचत नाही, अशी या भाषेची गंमत आहे. असे असले तरी त्यात वावगे असे काही वाटत नाही. अशी भाषा या चित्रपटात वापरल्याशिवाय त्यातली भावना पोहोचूच शकणार नाही. ही भाषा विषारी वाटत नाही, गोडच वाटते. धनगरांची अशी वेगळी काही भाषा नाही. यातली भाषा ही नगर व पुण्याकडची ग्रामीण बोलीभाषा आहे, या भाषेला रांगडी भाषा म्हणता येईल. मी मुळात जरी नगरचा असलो, तरी चित्रपटात ही भाषा बोलताना मला वेगळे कष्ट घ्यावे लागले, तसेच मी मुळात नगरचा पैलवान गडी आहे आणि कुस्ती खेळण्याची संधी मला या चित्रपटात मिळाली आहे. त्यामुळे मी जास्त आनंदात आहे. - भाऊसाहेब शिंदे, नायक
मराठमोळा ‘ख्वाडा’ निघाला पडद्यावर!
By admin | Updated: October 18, 2015 23:59 IST