Join us  

Ekdam Kadak Movie, Manasi Naik: 'मॅडम कडक हाय' म्हणत मानसी नाईकचा 'एकदम कडक' जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 10:00 PM

'एकदम कडक' चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला 'मॅडम कडक हाय' गाण्यावर थिरकली मानसी नाईक

Ekdam Kadak Movie, Manasi Naik: 'एकदम कडक' चित्रपटाच्या चर्चेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या भव्यदिव्य अशा 'एकदम कडक' चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याने तर आगच पसरवली आहे. याचे कारण ही अर्थात विशेष आहे, ते म्हणजे चित्रपटातील कलाकार तर आहेतच मात्र या चित्रपटात अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक तिच्या दिलखेचक अदांनी 'मॅडम कडक हाय' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. नुकताच 'एकदम कडक' चित्रपटाचा अनावरण सोहळा धूम धडाक्यात पार पडला त्यावेळी चित्रपटातील कलाकारांनी उपस्थित राहून आणि मानसीच्या एकदम कडक अशा 'मॅडम कडक हाय' या गाण्याच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली.

आपल्या डान्स कौशल्य आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मानसी नाईक सातत्याने चर्चेत येत असते. सोशल मीडियावरही ती सक्रीय असून नवनवे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तेही 'एकदम कडक' चित्रपटातील 'मॅडम कडक हाय' या गाण्यामुळे. 'एकदम कडक' चित्रपटातील 'मॅडम कडक हाय' हे गाणे  'ओ शेठ' फेम सुप्रसिद्ध गायक उमेश गवळी यांनी त्यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध केले आहे तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी गायली असून या चित्रपटाला संगीत स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. 'ओम साई सिने फिल्म' प्रस्तुत आणि दिग्दर्शक गणेश शिंदे दिग्दर्शित आणि निर्मित 'एकदम कडक' हा आशयघन कथा असलेला चित्रपट येत्या 2 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या धमाकेदार चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 'एकदम कडक' चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री  सोनुने या कलाकारांचा अभिनय पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर आता चित्रपटातील 'मॅडम कडक हाय' गाणे हे रसिक प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका चुकवतय यांत शंका नाही. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकुळ घालायला सज्ज होत आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटमानसी नाईकमराठीभाग्यश्री मोटे