Join us

गोवा महोत्सवात पहिल्यांदाचदहा मराठी चित्रपट

By admin | Updated: October 29, 2016 03:32 IST

गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘१०व्या एनएफडीसी फिल्म बझार’साठी सैराट, नटसम्राट, दगडी चाळ, कट्यार काळजात घुसली आणि हलाल या दहा मराठी चित्रपटांची निवड

गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘१०व्या एनएफडीसी फिल्म बझार’साठी सैराट, नटसम्राट, दगडी चाळ, कट्यार काळजात घुसली आणि हलाल या दहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. फिल्म सिटी आणि फिल्म बझार हे संयुक्तपणे दुसऱ्यांदा या एनएफडीसी चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत. या महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटात सैराट, नटसम्राट, हाफ टिकीट, डबलसीट, हलाल, कट्यार काळजात घुसली, बर्नी, सहा गन, दगडी चाळ आणि कोटी यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांचे प्रदर्शन इंडस्ट्री स्क्रिनिंग आणि द व्हिविंग रूम याअंतर्गत करण्यात येणार आहे. या दहा चित्रपटनिर्मात्यांचा समावेश प्रोड्युसर्स लॅबमध्ये असेल.विशेष म्हणजे, या चित्रपटांची निवड महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाने केली आहे. महोत्सवादरम्यान फिल्म आॅफिसमधून राज्यातील विविध लोकेशन्सची माहिती देण्यात येईल. प्रोड्युसर्स लॅबमध्ये सहभागी चित्रपटनिर्माते नव्या निर्मात्यांना रचनात्मक आणि आर्थिक या दोन्ही बाबींवर समन्वय साधण्यासाठी मार्गदर्शन करतील. इंडस्ट्री स्क्रिनिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या थिएटरची निवड करण्यात आल्याने निर्मात्यांना आपल्या चित्रपटांना डिजिटल प्लॅटफार्मवर प्रदर्शित करता येणार आहे.मागच्या वर्षी एनएफडीसी चित्रपट महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद चांगला होता. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्यावतीने सैराट आणि नटसम्राट या चित्रपटांचा समावेश करण्यात आल्याने आम्ही आनंदी आहोत, असे एनएफडीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मराठी चित्रपट अमराठी प्रेक्षकसुद्धा पाहत आहेत. मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे; परंतु बॉक्स आॅफिसवर मात्र अजूनही हवे तसे यश मिळत नाही. मराठी चित्रपटांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, हा आमचा हेतू आहे. एनएफडीसी चित्रपट महोत्सव हा मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय मंच प्रदान करण्यासाठी योग्य पर्याय आहे. यासाठी दहा मराठी चित्रपटांची निवड आम्ही केली असल्याने चित्रपट निर्माते खूष असल्याचे चित्रनगरीचे संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. सैराट : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात सैराटमय वातावरण निर्माण केले होते. या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांंची मने जिंकली. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १०० कोटींचा गल्ला कमावून मराठी इंडस्ट्रीत नवा इतिहास निर्माण केला.नटसम्राट : या चित्रपटानेदेखील बॉक्स आॅफिसवर बाजी मारली होती. या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. आजही या चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांच्या ओठी आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटानेदेखील प्रेक्षकांना सिनेमागृहात येण्यास भाग पाडले होते. हाफ टिकीट : समीत कक्कड दिग्दर्शित हाफ टिकीट या चित्रपटानेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात शुभम मोरे आणि विनायक पोतदार या चिमुरड्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच अभिनेता भालचंद्र कदम यांचा अभिनयदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.डबलसीट : या चित्रपट अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे हे तगडे कलाकार पाहायला मिळाले. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच, या चित्रपटातील गाण्यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. समीर विध्वंस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.हलाल : हलाल हा चित्रपटही फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव, प्रीतम कांगणे हे कलाकार आहेत. कट्यार काळजात घुसली : सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, साक्षी तन्वर या कलाकारांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला त्यांच्या अभिनयाने चार चाँद लावले. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या चित्रपटावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला होता.बर्नी : तेजस्विनी लोणारी आणि नीलकांती पाटेकर यांनी बर्नी या चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. नीलकांती पाटेकर यांनी या चित्रपटातून अनेक वर्षांनंतर पुनरागमन केले होते. समीक्षकांनी या सिनेमाचे कौतुक केले. प्रेक्षकांनीदेखील चित्रपटाला पसंती दर्शविली होती. दगडी चाळ : अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे यांच्या दगडी चाळ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. मकरंद देशपांडे यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना जास्त भावली.