मराठी सिनेसृष्टीतील आगामी मराठी चित्रपट ‘यारी दोस्ती’ हा लवकरच प्रेक्षकांसमोर दोस्तीची नवीन व हटके संकल्पना मांडणार आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित 'यारी दोस्ती' या चित्रपटाचं ट्रेलर आणि शिर्षक गाणं नुकतंच मुंबई येथील साठ्ये महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आले. फ्रेण्डशिप डे च्या आठवड्यात आणि महाविद्यालयातील तरुणांसोबत दोस्तीच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणे ही खरी तर फ्रेण्डशिप डे ची भेटच म्हणायला हवी.
'यारी दोस्ती' चा ट्रेलर प्रकाशन सोहळा तरुणांच्या उत्साहामुळे दिमाखात पार पडला. यावेळी या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. तरुणांसाठी आणि तरुणांच्या मैत्रीवर आधारित या चित्रपटाला सर्वांकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री वाटते.
बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' या चित्रपटाचे लिखान आणि दिग्दर्शन शांतनु अनंत तांबे यांनी केले आहे. या चित्रपटात आकाश वाघमोडे, आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे, मिताली मयेकर, संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्या भूमिका पहायला मिळणार आहेत.
मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा 'यारी दोस्ती' हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.