कादंबरी कदम कोणासोबत अडकली लग्नबंधनात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 12:52 IST
अभिनेत्री कादंबरी कदम नुकतीच विवाहबंधनात अडकली. कादंबरी आणि दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी मुंबईत लग्न केले. या लग्नाची बातमी अभिनेत्री ...
कादंबरी कदम कोणासोबत अडकली लग्नबंधनात?
अभिनेत्री कादंबरी कदम नुकतीच विवाहबंधनात अडकली. कादंबरी आणि दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी मुंबईत लग्न केले. या लग्नाची बातमी अभिनेत्री अमृता सुभाषने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरून दिली. कादंबरी ही अमृताची बेस्ट फ्रेंड आहे. अमृताने कादंबरी आणि अविनाश अरुण यांचा फोटो पोस्ट करून कादंबरी आणि अविनाशने आज लग्न केले...माझ्या आयुष्यातील दोन जवळच्या व्यक्ती विवाहबंधनात अडकल्या आहेत. सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना मिळाव्यात... तुम्ही सगळ्यांनी तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा त्यांना द्या... आज मेरे यारों की शादी है असे लिहिले आहे. अमृता सांगते, "नुकताच मुंबईत कादंबरी आणि अविनाश यांचा विवाह झाला. कादंबरी ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे तर किल्ला या माझ्या चित्रपटाचा अविनाश दिग्दर्शक होता. माझ्या दोन मित्रांच्या लग्नासाठी मी खूप खूश आहे."कादंबरी आणि अमृता यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. या दोघींनी कुंदन शहा यांच्या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. अवघाची संसार या मालिकेत कादंबरीने अमृताच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. अवघाची संसार या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी काही महिने अमृता आजारी होती. तिला धड चालताही येत नव्हते. त्यावेळी मालिकेचे चित्रीकरण मढ आयलंडला असायचे. त्या दोघी त्यावेळी जेट्टीने जायच्या. एखाद्या लहान मुलाची आपण ज्याप्रकारे काळजी घेतो, तशी कादंबरी अमृताची काळजी घेत असे. अमृता अनेक गोष्टीत कादंबरीचा सल्ला घेते. काय कपडे घालू हे तर ती अनेकवेळा कादंबरीलाच विचारते. तिची ही लाडकी मैत्रीण लग्न करत आहे याचा तिला खूप आनंद झाला आहे.