Join us  

९९ व्या नाट्यसंमेलनाचं फलित काय ? 

By अजय परचुरे | Published: February 28, 2019 3:10 PM

महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडलेल्या नाट्यसंमेलनात मायबाप रसिकांना आणि नाट्यरसिकांना नेमकं काय मिळालं ?नेमकं याचं फलित काय ? हे प्रश्न आता प्रामुख्याने समोर आले आहेत.

ठळक मुद्देनागपूरच्या नाट्यसंमेलनात लेखकांनी दिले सरकारला फटकारे नाट्यसंमेलनात गाजला शहरी नक्षलवादाचा मुद्दा 100 व्या नाट्यसंमेलनाची सुरवात सांगलीपासून

अजय परचुरे 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं ९९ वं नाट्यसंमेलन नागपूरमध्ये अखेरीस पार पाडलं. महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडलेल्या या नाट्यसंमेलनात मायबाप रसिकांना आणि नाट्यरसिकांना नेमकं काय मिळालं ?नेमकं याचं फलित काय ? हे प्रश्न आता प्रामुख्याने समोर आले आहेत. नाट्यसंमेलनाच्या नांदीलाच नाट्यसंमेलानाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मांडलेला शहरी नक्षलवादाचा प्रश्न संमेलनभर चर्चिला गेला. उद्घाटक आणि ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आपल्या भाषणातून सरकारला दिेलेले फटकारे आणि रंगकर्मी आणि रंगधर्मी यातील सांगितलेला फरक नव्या जुन्या सर्व रंगकर्मींना विचार करायला लावणारा होता. त्यामुळे या नाट्यसंमेलनात गज्वी आणि एलकुंचवार यांच्या बौध्दिक पण तितक्याच शाब्दिक टोचणीनं नाटकवाल्या मंडळींना येणाºया काळात आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं याचं नेमकं गमक सापडलंय इतकं नक्की.

    मागच्यावर्षी मुलुंडच्या ९८ व्या नाट्यसंमेलापूर्वी प्रसाद कांबळी आणि त्यांच्या नाट्यपरिषदेच्या टीमने काही दिवसांपूर्वीच नाट्यपरिषदेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. वेळ कमी होता मात्र मुलुंडचे नाट्यसंमेलन प्रसाद आणि टीमने अत्यंत शिस्तबध्द आणि अर्वणनीय असं केलं होतं. ९९ व्या नाट्यसंमेलनापूर्वी नाट्यपरिषदेकडे ८ महिन्यांचा काळ होता. आणि  डिसेंबर २०१८ ला हे संमेलन नाट्यपरिषदेने नागपूर शाखेकडे सोपवल्याने या संमेलनाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपल्या होम पिचवरच संमेलन होणार म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनात कोणतीही कसर ठेवणार नाहीत हे अगदी त्रिवार सत्य होतं. नागपूरच्या नाट्यपरिषदेने आपल्या लौकिकास साजेसं असं नाट्यसंमेलन ३ दिवस करून दाखवलं. उद्घाटनाला ज्येष्ठ नाटककार आणि विदर्भाचे सुपुत्र महेश एलकुंचवार यांना बोलावून परिषदेने पहिलाच षटकार ठोकला. एलकुंचवार आणि प्रेमानंद गज्वी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आजच्या नाट्यव्यवस्थेवर घणाघाती हल्ला चढवत सरकार आणि सांस्कृतिक कार्याला एकप्रकारे अंजन घालण्याचा प्रयत्न केला आणि तो काही अंशी यशस्वी ठरला. मुख्यमंत्र्यांनाही संमेलनात येऊन गज्वींना आश्वसत करावं लागलं की सरकार लेखकांच्या,विचारवंताच्या स्वातंत्र्याला तडा जाऊ देणार नाही ,सरकार त्यांच्यासोबत आहे हे या नाट्यसंमेलनाचं एक मोठं फलित आहे. 

    विदर्भातील नाट्यचळवळीला एक मोठी परंपरा आहे. या परंपरेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या नाट्यसंमेलनाने मोठी मदत केली आहे. मुंबई,पुणे,नाशिक यापलीकडेही रंगभूमी आणि रंगकर्मी आहेत याचं ताजं चित्र नागपूरच्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळालं. गेली कित्येक वर्ष विदर्भातील झाडेपड्डी रंगभूमी मुंबई पुण्याच्या रंगकर्मींना तोंडात बोटं घालायला लावेल असे एक सो एक नाटकांचे प्रयोग करत आहेत. अपुरी साधनं, नाट्यगृहांची वानवा असूनही मोठ्या जिद्दीने अगदी ग्रामीण भागातील मुलंही जो आविष्कार घडवतात त्याला तोड नाही. आक्रोश,राडा ,मोमोज ही नाटकं पाहिल्यावर मुंबई पुण्यातून आलेल्या नाटककार,दिग्दर्शकांनीही त्याला भरभरून दाद दिली. मात्र आता सरकारदरबारी विदर्भाच्या या सांस्कृतिक जडणघडणीविषयीची जी अनास्था आहे ती दूर होणे फार गरजेचे आहे. विदर्भातील अनेक रंगकर्मींमध्ये मुख्य प्रवाहात येऊन काम करण्याची ताकद आहे त्यांना सरकार दरबारी योग्य ते पाठबळ देणे अतिशय गरजेचे आहे आणि त्याची पूर्तता या सरकारने त्वरीत करण्याची गरज असल्याचं मत संमेलनाला आलेल्या दिग्गजांनी आपल्या मनोगतात सारखं व्यक्त केलं आहे. 

संमेलनात झालेल्या परिसंवादातही वामन केंद्रे,अतुल पेठे,शफाअत खान, विभावरी देशपांडे यांनी मुंबई-पुण्याच्या बाहेर पडून ग्रामीण भागातील नाट्यकर्मींना हेरण्याचे सुतोवाच केले. राज्य नाट्यस्पर्धांच्या बक्षिसात भरघोस वाढ करण्याची मागणी, ग्रामीण भागातील बालनाट्यचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळांशाळांतून त्याचे प्रयोग करणे, आणि हौशी आणि प्रायोगिक नाटक करणाऱ्या ग्रामीण भागातील रंगकर्मींना नाममात्र दरात नाट्यगृहं उपलब्ध करून देणे ह्या मागण्यांना या संमेलनात जोर देण्यात आला. नागपूरचं नाट्यसंमेलन एकाअर्थी विचारवंतांनी सरकार आणि मोठ्या रंगकर्मींचं डोळे मोठ्यानं उघडे करण्याचे ठरले आहे. १०० वं नाट्यसंमेलन आता एका पायरीवर आहे. ज्याची सुरवात सांगलीमध्ये जानेवारी २०१९ पासून होणार आहे. प्रेमानंद गज्वींसारखा विचारवंत नाटककाराकडे १ वर्षाचा कार्यकाळ आहे. या कार्यकाळाचा आणि नाट्यसंमेलनात ज्येष्ठांनी मांडलेल्या विचारांचा नाट्यपरिषदेने सरकारच्या मदतीने योग्य तो विचार केल्यास नागपूरची संत्री चांगली पिकली आणि गोडही लागली असं म्हणायला काही हरकत नाही. 

टॅग्स :मराठी नाट्य संमेलननाटक