Join us  

कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला! आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट

By रूपाली मुधोळकर | Published: September 22, 2020 11:31 AM

आशालता वाबगावकर यांच्या निधनाने कलाविश्व हळहळले

ठळक मुद्देआशालता यांनी नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.  100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आशालता या नावाने ओळखल्या जाणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आशालता यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ,  निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेत्री फैय्याज यांच्यासह अनेकांनी आशालता यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही आशालता यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

 आज फार हतबल झालेय- रेणुका शहाणे

आज फार हतबल झालेय. कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताई अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणा-या आशालता ताईंच्या आत्म्याला शांती लाभो,  अशा शब्दांत रेणुका यांनी आशालता यांना श्रद्धांजली वाहिली.

माझी चिरतरूण मैत्रिण...

‘महेशा ,काय रे कसा आहेस बेटा तू’ असं प्रेमाने चौकशी करणारा आशालता यांचा फोन आला की माझा तो दिवसच नाही तर पुढचे काही दिवस मस्त आनंदात जायचे. नेहमी फोनवर आणि भेटल्यावर ही भरभरून बोलून पोटभर गप्पा झाल्याशिवाय माझी ही मैत्रीण समाधानी होत नसे.2005 मध्ये माज्या एका टिव्ही सिरीयल मध्ये आशालता यांनी काम केले होते तेंव्हा पासूनची आमची मैत्री आणि त्यातला स्नेह कधी कमी झाला नाही.वयाने ज्येष्ठ असूनही सतत नवनवीन शिकण्याची आणि पाहण्याची हौस असलेली ही माझी चिरतरुण मैत्रीण.वयानुसार कधी त्यांनी प्रकृतीची कुठलीच तक्रार केलेली मला तरी आठवत नाही.... अशी पोस्ट लिहून महेश टिळेकर यांनी आशालता यांच्या आठवणींना उजाळा दिला.

त्या माझ्या गुरू भगिनी होत्या...त्या माझ्या गुरुभगिनी होत्या. एकाच वेळी आम्ही स्टेजवर एन्ट्री घेतली होती. त्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. ही नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीची न भरून निघणारी पोकळी आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

अशी झाली कोरोनाची लागण?आशालता यांनी नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.  100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासन ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शूटींगसाठी त्या साता-यात होत्या़ या मालिकेसाठी मुंबईतून एका डान्स ग्रुप बोलवण्यात आला  होता. त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान आशालता यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.  ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत.  आशालता वाबगावकरांची यात महत्त्वाची भूमिका होती़ सोमवारी अचानक आशालता यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.   आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.  

गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास

टॅग्स :रेणुका शहाणे