रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखचा 'वेड' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या सिनेमात अनेक नवोदित कलाकारही झळकले होते. नुकतंच 'वेड' सिनेमात काम केलेल्या अभिनेत्याचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्याच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.
'वेड' सिनेमात काम केलेला अभिनेता अविनाश खेडेकर याने गुपचूप साखरपुडा केला आहे. अविनाशने मुक्ता वळसे पाटील हिच्याशी साखरपुडा केला आहे. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साखरपुड्यासाठी मुक्ताने हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक पेहराव केला होता. तर अविनाशने कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्यांच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश गेली काही वर्ष मराठी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत आहे. 'वेड' सिनेमात त्याने गण्या ही विरोधी भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने 'परिस', 'कॉलेज डायरी', 'उनाड' अशा चित्रपटांत काम केलं आहे. मुक्तादेखील अभिनेत्री असून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. 'फसक्लास दाभाडे', 'आत्मपॅमफ्लेट', 'गुड बॅड गर्ल' अशा सिनेमात ती दिसली होती.