Join us

"मला नवीन गाडीतून उतरायला लावलं, कारण.."; वंदना गुप्तेंना सांगितली राज ठाकरेंची खास आठवण

By देवेंद्र जाधव | Updated: July 10, 2025 16:56 IST

वंदना गुप्ते राज ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या. मुलाखतीत सांगितलेल्या प्रसंगाची चर्चा आहे. काय घडलेलं नेमकं?

अभिनेत्री वंदना गुप्ते या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. वंदना गुप्तेंना आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. वंदना यांचं नाव जरी घेतलं तरी एनर्जी, मिश्किलपणा, मस्तीखोरपणा अशा अनेक गोष्टी समोर येतात. वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. वंदना यांचे राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशीच एक गंमतीशीर आठवण वंदना यांनी सांगितली.

वंदना यांनी सांगितली राज ठाकरेंची खास आठवण

वंदना यांनी अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, "राज आणि शर्मिलाच्या लग्नात आम्ही भयंकर धमाल केली. माझ्यातर्फेच त्यांचा सगळा व्यवहार झाला. राजा अत्यंत गोड माणूस आहे. मी नवीन गाडी घेतली होती. ती गाडी घरी पार्क करायला घेऊन चालले होते. तर राज तिकडे शिवाजी पार्कजवळ फेऱ्या मारत होता. थांब! उतर, असं मला तो म्हणाला. मी मग गाडीतून उतरले."

"नवीन गाडी आणलीये, असं मी त्याला सांगितलं. हो कळलं मला, सगळं प्लास्टिकचे कव्हर घालून फिरतेस. आधी उतर, असं तो मला म्हणाला. इथेच मराठी माणूस दिसतो. त्याने मला गाडीतून उतरायला लावलं. सगळी प्लास्टिकची कव्हरं काढायला लावली त्याने. बापरे! आताच काढ सगळं, असं तो म्हणाला."अशाप्रकारे वंदना यांनी राज ठाकरेंची गंमतीशीर आठवण शेअर केली. राज यांची पत्नी शर्मिला ठाकरेंशी वंदना यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज - शर्मिला यांची प्रेमपत्र एकमेकांना नेऊन देण्याचं काम वंदना करायच्या, अशीही आठवण त्यांनी सांगितली होती.

टॅग्स :वंदना गुप्तेराज ठाकरेमराठी चित्रपटमराठी अभिनेता