Join us  

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं! कशी आहे गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी? वाचा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 12:48 PM

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं या चित्रपटात दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे...

- संजय घावरे..........................

दर्जा: ****  कलाकार : सुमीत राघवन, उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपात्रे, अद्वैत वाचकवडे, मेरवान काळे, अद्वैत गुळेकर, राजेश भोसले, सतिश आळेकर, ऋषिकेश देशपांडेकथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, संगीत : डॉ. सलील कुलकर्णीनिर्माते : अरुंधती दात्ये, अनूप निमकर, नितीन वैद्य, डॉ. सलील कुलकर्णीशैली : फॅमिली ड्रामाकालावधी : 2 तास 18 मिनिटे..........................

गोष्ट आणि जीवन यांचं एक अतूट नातं आहे. प्रत्येकाचं आयुष्य अनेक गोष्टींनी विणलेलं आहे. प्रत्येकाची आपली एक गोष्ट आहे. त्या गोष्टीतही विविध गोष्टी आहेत. काही लोकांना या गोष्टी सांगायला खूप आवडतात. या चित्रपटात दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी अशाच एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत विचार पोहोचवण्याची कला अवगत असलेला बाबा आणि त्याच्या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या शाळेची, त्याच्या प्रामाणिकपणाची आणि त्याच्या दृढ निश्चयांची गोष्ट या चित्रपटात सुमधूर संगीताची किनार जोडून सलील यांनी सादर केली आहे.

गोष्टी आणि नाटकांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याला प्राधान्य देणारा शिक्षक किरण आणि त्याचा मुलगा चिंतन यांची भावस्पर्शी कथा यात आहे. वडीलांचा प्रकाशनाचा व्यवसाय असूनही जगावेगळी शाळा यशस्वीपणे चालवणाऱ्या किरणचे सर्व गुण त्याच्या मुलाने म्हणजेच चिंतनने आत्मसात केलेले असतात. प्रत्येक महिन्याला एक नाटक करून त्याद्वारे मुलांपर्यंत विचार पोहोचवणाऱ्या किरणला स्वत:चं अ‍ॅम्फीथिएटर उभारायचं असतं. यासाठी त्याला जय नावाच्या मित्राने देऊ केलेले अंडरवर्ल्डचे पैसे नको असतात. चिंतनवर किरणच्या वागणूकीचा आणि विचारांचा इतका घट्ट पगडा असतो की, कपड्यांपासून सवयींपर्यंत तो पूर्णपणे आपल्या बाबांसारखा बनलेला असतो. बाबाच त्याचा आयडॉल असतो. अ‍ॅम्फीथिएटर सुरू करण्यासाठी किरणला सरकारकडून जागाही मिळते, पण अचानक एक घटना घडते आणि बसवलेली घडी पूर्णपणे विस्कटून जाते.

लेखन-दिग्दर्शन : गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण हा चित्रपटाचा विषय खूपच नावीन्यपूर्ण आणि वेगळा आहे. त्यावर गुंफण्यात आलेली पटकथा टप्प्याटप्प्याने कुतूहल निर्माण करते. लेखनापासून दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाजू सलील यांनी उत्तमरीत्या सांभाळल्या आहेत.

हा चित्रपट मध्यंतरापर्यंत हलके-फुलके क्षण देतो. या पार्टमध्ये चित्रपट पुढे काय दाखवणार आहे हा प्रश्न मात्र कायम सतावतो. मध्यंतरानंतर चित्रपट खूपच भावूक करतो. अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. आता काहीतरी चमत्कार होईल आणि मनोरंजक मूल्यांचा आधार घेत दिग्दर्शक अपेक्षेपेक्षा वेगळं करेल असं वाटतं, पण सिनेमॅटीक लिबर्टीला मूठमाती देत दिग्दर्शक वास्तववादी शेवट करतो आणि इथेच तो जिंकतोही. गोष्टींतून मिळालेल्या विचारांतूनच एक लहान मुलगा कशा प्रकारे अकाली आलेली जबाबदारी स्वीकारण्यास तयार होतो हे देखील यात दाखवण्यात आलं आहे. पुस्तकी ज्ञानाची व्याख्या मोडीत काढून गोष्टींद्वारे विचार पोहोचवणारी शाळा, हातात छडी न घेता गोष्टी सांगत शिकवणारे शिक्षक, गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांनी घेतलेली मेहनत, अनाथ मुलांनाही शिक्षणाचा अधिकार असल्याचं सांगणारा तत्त्वनिष्ठ शिक्षक, शिक्षकाचा विश्वासघात न करता शिकणारा अनाथ विद्यार्थी, आपला मुलगा जगापेक्षा वेगळं करत असल्याची जाणीव ठेवून त्याच्या मागे उभे राहणारे आई-वडील आणि पती संकटात सापडल्यानंतर साथ देणारी पत्नी अशा काही वेगळ्या आणि काही आपल्याच घरातील गोष्टी या चित्रपटात आहेत. संगीत ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मारुती स्तोत्रापासून, अंगाई गीतापर्यंत सर्वच गाणी श्रवणीय आहेत. कॅमेरावर्क, पार्श्वसंगीत आणि संकलनाचा एकत्रित प्रभाव छान झाला आहे.

अभिनय : सुमित राघवनच्या आजवरच्या करियरमधील सर्वात उत्तम भूमिका आणि त्यानं अभिनयाचं घडवलेलं अफलातून दर्शन भारावून टाकणारं आहे. चिंतनच्या भूमिकेत अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकारानं पुरस्कारावर नाव कोरण्याची तरतूद करून ठेवली आहे. उर्मिला कोठारेनं आई आणि पत्नीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. डॉ. मोहन आगाशेंनी साकारलेला समजूतदार पिता आणि सुहास जोशीच्या रूपातील मायाळू आई सुखी कुटुंबाची चौकट पूर्ण करणारी आहे. पुष्कर श्रोत्रीनं मित्राची भूमिका साकारताना समतोल राखला आहे. मेरवान काळेनं अनाथ मुलाची, तर अद्वैत वाचकवडेनं चिंतनच्या जीवाभावाच्या मित्राची भूमिका चांगली वठवली आहे. इतर सर्वांनीच चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि कर्णमधूर संगीत

नकारात्मक बाजू : फक्त विनोदी आणि मसालेपटांचे चाहते असणाऱ्यांची निराशा होईल.

थोडक्यात : हा केवळ एक चित्रपट नसून एक विचार आहे, जो समाजात खोलवर रुजला गेला तर पुस्तकांमध्ये अडकलेली आणि दफ्तरांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांची पिढी पुस्तकाबाहेर पडूनही ज्ञान मिळवण्यासाठी धडपड करेल. यासाठी प्रत्येक पालकाने हा चित्रपट मुलांना दाखवायला हवा.

टॅग्स :एकदा काय झालंसुमीत राघवनसलील कुलकर्णीउर्मिला कानेटकर कोठारेसिनेमा