Join us

Bigg Boss फेम शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आला समोर, झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:55 IST

Shivani Surve: आता शिवानी लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.

शिवानी सुर्वे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'देवयानी', 'नव्या', 'एक दिवाना था' अशा अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मात्र, बिग बॉस मराठीमुळे ती चर्चेत आली होती. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे तिने चाहत्यांचे मन जिंकले होते. आता शिवानी लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे  आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. या चित्रपटाचे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक एक्शन - रोमँटिक सिनेमा आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या आत्तापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असे म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक आत्तापर्यंत कोणी पाहिला नसेल असा आहे.

मराठी -हिंदी मालिका , मराठी सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर शिवानीचा हा लूक हा थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा, आत्तापर्यंत शिवानीला सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता हा तिचा ग्लॅमरस नसलेला लूक आहे, त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या लूक बद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे. 

शिवानी तिच्या या लूकबद्दल सांगते की, “आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरेतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला . माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर  दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप  मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे  प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे.”

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी - कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या सिनेमात मराठी - कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी सिनेमात एक्शन - रोमँटिक सिनेमा कमी येतात, त्यात हा सिनेमा वेगळा ठरणार आहे.  दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :शिवानी सुर्वे