Join us  

म्हणून मंगेश कंठाळे यांनी केली 'सूर सपाटा'ची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 8:00 AM

पदार्पणातच त्यांनी स्पोर्ट्स हा विषय निवडत आपल्या मातीतला खेळ म्हणजेच 'कबड्डी'वर आधारित 'सूर सपाटा' यशस्वीरीत्या साकारला. 

ठळक मुद्दे 'कबड्डी'वर आधारित 'सूर सपाटा' यशस्वीरीत्या साकारला

दिग्दर्शकाला कॅप्टन ऑफ द शिप असं संबोधलं जातं. त्याच्या आश्वासक हातांत आणि अनुभवी दूरदृष्टीच्या जोरावरच संपूर्ण नौकेची इथे चित्रपटाची जबाबदारी असते असं म्हणायला हरकत नाही. अशीच एक चित्रपटरूपी नौका हिंदी-मराठीतील दिग्ग्ज कलाकारांसमवेत सज्ज झाली आहे.  त्याचं नाव आहे 'सूर सपाटा'. जयंत लांडेंच्या लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. ली. बॅनरद्वारे हा चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होत आहे आणि हो या नौकेचा कॅप्टन आहे मंगेश कंठाळे. हे नाव आपण बऱ्याचदा मालिका क्षेत्रात ऐकलं आहेच आत्ता त्यांनी आपला पहिला-वहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. पदार्पणातच त्यांनी स्पोर्ट्स हा विषय निवडत आपल्या मातीतला खेळ म्हणजेच 'कबड्डी'वर आधारित 'सूर सपाटा' यशस्वीरीत्या साकारला. 

'कुंकू', 'सरस्वती' यांसारख्य मालिकांचे यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर मंगेश कंठाळेंनी आपला मोर्चा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळवला. पहिलाच चित्रपट खेळावर काढण्यामागील उद्देश सांगताना, मंगेशजी म्हणतात ''माझ्या शालेयजीवनात मी स्टेटलेव्हल पर्यंत मैदानी खेळ खेळलेलो आहे. अलीकडच्या मुलांनाऑनलाईन गेम्स खेळताना पाहून त्यांच्या शारीरिक विकासाची मला काळजीच वाटते. एक तर काही वर्षांपूर्वी मी स्वतः स्पोर्ट्सपर्सन राहिल्यामुळे मला त्यातले बारकावे माहित आहेत आणि दुसरी गोष्ट जसं मी आधी म्हटलं की मुलांचा आत्मविकास थांबलाय त्याला चालना द्यावी म्हणून स्पोर्ट्सवर त्यातही कबड्डीवर चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता कबड्डीचा का...? तर कबड्डी हा खेळ आपल्याला एकमेकांना धरून राहायला शिकवतो. साखळी शिवाय आपण स्पर्धकाला मात देऊ शकत नाही ही गोष्ट आपल्याला आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने मात करायला शिकवते असा माझा निर्मळ हेतू आहे.'' 

'सूर सपाटा'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाय कथा-पटकथा आणि कलाकारांची अचूक निवड अशी चौफेर मुशाफिरी करत संपूर्ण टीम एका गुच्छात बांधताना त्यांनी बरेच कष्ट घेतले. कबड्डी खेळणाऱ्या मुलांच्या निवडीदरम्यान त्यांनी घेतलेल्या ऑडिशन्समधून राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबावडे या तगड्या कलाकरांना फायनल केले गेले. शिवाय माजी कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते मा. श्री. शांताराम जाधव यांच्याशी सतत चर्चा करत चित्रपटातील कबड्डी सामन्यांच्या चढाओढींत रंगत आणली हे विशेष. हेही नसे थोडके तर ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंनासुद्धा या चित्रपटात सक्रिय सहभागी करून घेण्यात मंगेशजींना यश मिळालं. 'सूर सपाटा'चा जल्लोष २१ मार्चपासून महाराष्ट्रात सर्वत्र होईलच पण मराठी मनोरंजनक्षेत्रालाही एका गुणी दिग्दर्शक लाभेल ह्यात काही शंका नाही

टॅग्स :सूर सपाटा