अभिनेता अतुल परचुरे यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. कामावरही परतले होते. मात्र काही कारणामुळे त्यांची तब्येत पुन्हा खालावली. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त एक अतुलनीय आठवण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता सुनील बर्वेने अतुल परचुरेंसोबतची एक खास आठवण सांगितली. हा किस्सा सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.
सुनील बर्वे म्हणाला की, "एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना माझे वडील खूप आजारी होते. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि खर्चही मोठा होता. दौऱ्यावरून परतल्यावर मला घरी एक पत्र मिळालं. त्या पत्रात एक छोटीशी चिठ्ठी होती 'प्रिय मित्रा, आनंदाच्या क्षणी आपण नेहमी एकत्र असतो, मग दु:खाच्या क्षणी दूर कसा राहू?' त्या काळात अनेक मित्रांनी मला आर्थिक मदत केली होती. नंतर मी सगळ्यांचे पैसे परत केले, पण अतुलला १ रुपया कमी दिला. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं, 'हा १ रुपया आयुष्यभर माझ्यावर उधार राहील.' ...आता तो उधार पुढच्या जन्मापर्यंत राहणार आहे."
सोनिया परचुरे म्हणाल्या...या कार्यक्रमात अतुल परचुरेंची पत्नी सोनिया परचुरे यांनी पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "माझं अतुलमुळेच रंगमंचाशी नातं जुळलं. त्यामुळे अतुल नसताना मला कोणत्या थिएटरमध्येही अजून जाता येत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळे आज आलात मला खूप चांगलं वाटतंय. ३० वर्षात मी अतुलला जे बघितलं तो अतुल आणि तो नसताना आज मी ज्या अतुलला बघतेय तो वेगळाच आहे. त्याच्याविषयी सगळेजण इतकं बोलत आहेत. अतुलचं मित्रप्रेमही खूप होतं. शेवटच्या चार पाच वर्षात मी अतुलबरोबर एकही सिनेमा पाहिला नाही. कारण सगळे सिनेमे त्याने विनय केंकरेंबरोबर पाहिले असायचे. विजय, सुनील, संजय आज तुम्ही इथे आलात, भरभरुन बोललात खरोखरंच त्यासाठी धाडस लागतं.अतुल जेव्हा रुग्णालयात होता तेव्हा सतत म्हणायचा की सुनीलला सांगितलं आहेस ना की नाटक...शेवटपर्यंत त्याच्या डोक्यात नाटकाचेच विचार होते. मला फार बोलता येत नाहीये.. मी आज सगळ्यांचेच आभार मानते."
Web Summary : Sunil Barve shared a heartfelt memory of Atul Parchure's financial support during his father's illness, recalling a symbolic one-rupee debt that will remain forever. Parchure's wife, Sonia, also shared emotional memories of their life together centered around theater.
Web Summary : सुनील बर्वे ने अपने पिता की बीमारी के दौरान अतुल परचुरे द्वारा किए गए वित्तीय समर्थन की एक हार्दिक स्मृति साझा की, जिसमें एक प्रतीकात्मक एक रुपये के ऋण को याद किया गया जो हमेशा के लिए रहेगा। परचुरे की पत्नी, सोनिया ने भी थिएटर के आसपास केंद्रित अपने जीवन की भावनात्मक यादें साझा कीं।