Join us  

जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 10:39 PM

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोस्टर लाँच, चित्रपटाने गाजवले अनेक फिल्म फेस्टिवल

Territory Marathi Movie: गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने वाघ, बिबट्या यांच्यासारखे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची अशीच थरारक कहाणी १ सप्टेंबरपासून उलगडणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे.

जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टेरिटरी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च विधान भवन येथे करण्यात आले. या प्रसंगी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन श्रीराम, निर्माते श्रीराम मुल्लेमवार आणि अभिनेते संदीप कुलकर्णी उपस्थित होते. डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे "टेरिटरी" हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो आणि त्याला शोधण्याची थरारक मोहीम या कथासूत्रावर "टेरिटरी" हा चित्रपट बेतला आहे. 

दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये ही  मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर आता ते "टेरिटरी" या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आणि  पारितोषिकप्राप्त ठरला आहे. तसेच पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फेस्टिवल मार्केट,मेटा फिल्म फेस्टिवल,दुबई आणि मुंबई इंडि फिल्म फेस्टिवल     येथे ही  या चित्रपटाची निवड झाली होती. कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

जंगल, वन्यजीव अशा विषयांवर काही मोजके अपवाद वगळता फार चित्रपट झालेले नाहीत. त्यामुळे टेरिटरी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटसुधीर मुनगंटीवारसंदीप कुलकर्णी