Tejaswini Pandit Swami Samarth: दत्तगुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना येत असतात. कठीण प्रसंगात प्रचंड स्वामी बळ पाठीशी असल्याची अनुभूती भक्तांना मिळते. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची सेवा करतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हीदेखील स्वामी भक्त आहे. तिला स्वामींच्या भक्तीचा प्रत्यय वारंवार आला आहे. नुकतंच तेजस्विनीनं सोशल मीडियावर श्री स्वामी समर्थांचा फोटो शेअर करत श्रद्धा व्यक्त केली.
तेजस्विनी पंडितनं श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिनं विठ्ठलाच्या रुपात सजलेल्या स्वामी समर्थांचा फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "माझ्या मनातलं सगळंच तुम्हाला माहीत आहे, फक्त पाठीशी रहा आणि बळ द्या स्वामी माऊली. आषाढी एकादशी अगदी पर्वावर असताना हे चित्र नजरेस पडणं म्हणजे किती सुरेख योगायोग", या शब्दात तिनं श्रद्धा व्यक्त केली. तेजस्विनीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी ‘श्री स्वामी समर्थ’ अशा कमेंट केल्यात.
तेजस्विनी पंडितला मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री ओळखले जाते. कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने सिनेसृष्टीत स्वत:चं नाव कमावलं. तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच तिचा 'येरे येरे पैसा ३' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनीसह कलाकारांच्या यादीत सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.