विषमतेच्या पल्याड जाऊन कला व प्रेमाची सांगड घालणारा 'ताटवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 17:33 IST
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ताटवा या चित्रपटातील 'मी बी देवाची करणी..तु बी देवाची करणी'...अशा ह्दयस्पर्शी गाण्याने प्रेक्षकांना भारावून टाकले ...
विषमतेच्या पल्याड जाऊन कला व प्रेमाची सांगड घालणारा 'ताटवा'
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ताटवा या चित्रपटातील 'मी बी देवाची करणी..तु बी देवाची करणी'...अशा ह्दयस्पर्शी गाण्याने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. समाजातील विषमतेच्या विचारधारेवर प्रकाश टाकणारा ‘ताटवा’ मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. ‘शरयू आर्ट प्रोडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांनी केली असून दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे यांनी केले आहे. लोकमत ऑफीसला दिलेल्या भेटीदरम्यान अरूण नलावडे म्हणाले, या चित्रपटातील ताटवा या शब्दाचा संदर्भ कुंपण असा मांडण्यात आला आहे. प्रेम आणि कला या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांना जातीचं बंधन कधीच अडवू शकत नाही. जाती, रूढी आणि परंपरा यांचे कुंपण लांघून प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. संजय शेजवळ आणि गौरी कोंगे ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सोबत अरूण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत. श्रीपाद भोळे लिखित या चित्रपटातील गीतांना संगीतकार अतुल जोशी, प्रशांत फासगे यांनी संगीत दिले असून गायक केवल वाळंज, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले, अतुल जोशी, प्रसाद शुक्ल यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.प्रत्येकाने नाविन्याचा ध्यास घेत स्वत:ला घडवायला हवं असं सांगताना ‘ताटवा’ या सिनेमातून हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची भावना निर्मात्या डॉ.शरयु पाझारे यांनी यावेळी व्यक्त केली. लोकमतशी बोलताना संजय शेजवळ म्हणाले, या चित्रपटाच्या माध्यमातून मला प्रथमच वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांना आशयसंपन्न असलेला हा चित्रपट नक्की आवडेल.