Join us  

लवकरच ‘टेक केअर गुड नाईट’ प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:19 PM

चित्रपट सायबर गुन्हेगारीवर बेतला आहे आणि मराठीत अशाप्रकारचा या विषयावरील हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळेही चित्रपट चर्चेत आहे. 

ठळक मुद्देसिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, इरावती हर्षे यांच्यासारखे दिग्गज कलाकार, सोबतीला आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या युवा भूमिका आणि गिरीश जयंत जोशी यांचे लेखन दिग्दर्शन यामुळे ३१ ऑगस्ट रोजी प्रद्रषित होणाऱ्या ‘टेक केअर गुड नाईट’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपट सायबर गुन्हेगारीवर बेतला आहे आणि मराठीत अशाप्रकारचा या विषयावरील हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळेही चित्रपट चर्चेत आहे. 

आज निम्नशिक्षित लोकांपेक्षा उच्चशिक्षित लोकच सायबर गुन्ह्यांना अधिक बळी पडतात, हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या गुन्ह्यांमुळे आर्थिक फटका बसतो आणि  कुटुंबाची घडीही बिघडते. तंत्रज्ञानाधारीत जीवनशैलीमुळे मध्यमवर्गीय शहरी कुटुंबातील २५ मधील एकजण या गुन्हेगारीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बळी पडतो. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बिकट होत असताना त्यावर प्रभावी आणि अचूक असे भाष्य करणारा आणि उपायही सुचवणारा‘टेक केअर गुड नाईट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कुटुंबाच्या भावनिक नात्यांची आणि विणीची झालर पटकथेला असल्याने तो एक वेगळा कौटुंबिक चित्रपट झाला आहे.

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे यांसारखे गाजलेले कलाकार आणि त्यांच्या जोडीला इंटरनेट आणि ऑनलाइन प्लटफॉर्म सर्वाधिक वापरणाऱ्या युवा पिढीचे प्रतिनिधी आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश जयंत जोशी यांनी केले असून त्याची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची आहे. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे संगीत चित्रपटाला आहे. “सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. ही आजच्या काळाची, आजचे प्रॉब्लेम मांडणारी कथा आहे. सायबर क्राईम कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही यातून अनुभवू शकता. तंत्रज्ञानाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये, याचे नेमके भाष्य यात आहेत,” लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी म्हणाले.   

“मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन हा चित्रपट आपल्याला देवून जातो. चित्रपटाची पटकथा मी ऐकली आणि त्यातल्या इन्स्पेक्टर पवारच्या प्रेमात पडलो. आपल्याकडे बर्‍याचदा पोलिस ‘सुपर-हयूमन’किंवा पूर्णपणे भ्रष्ट दाखवले जातात. यातील इन्स्पेक्टर पवार हा खूप खरा वाटणारा, वेगळ्या शेड्स असलेला आहे. त्यामुळे पटकथा ऐकल्यावर मी लगेचच ही भूमिका करायची ठरवले,” असे महेश मांजरेकर म्हणतात. 

सचिन खेडेकर म्हणतात, “या चित्रपटातील माझी भूमिका आणि खर्‍या आयुष्यातला मी यात खूप साम्य आहे. किंबहुना नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून घेताना धडपडणाऱ्या माझ्या पिढीतल्या अनेक वडिलांचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका आहे. त्यामुळे एक वेगळाच आनंद या भूमिकेतून मला मिळाला.”   

 “शहरात राहणाऱ्या न्युक्लीयर परिवारातील, आधुनिक तरीही सगळ्यांकडे लक्ष देणारी, स्वतःचे करीअर करू पाहणारी आई मी यात साकारतेय. स्वतःच्या कामाबद्दल पुरेसा आत्मविश्वास नाही, आणि एका घरात राहूनही आपल्या मुली मध्ये व आपल्यात संवाद नाही, याची तिला खंत आहे. पण मग असं काय घडतं की या सगळ्यावर मात करण्यास शिवाय दुसरा कोणता पर्यायच तिच्यासमोर उरत नाही हे या वेगाने उलगडत जाणाऱ्या चित्रपटाच्या कथानकातून प्रेक्षकांना कळेल.” असे इरावती हर्षे म्हणतात.

आपल्या भूमिके बाबत आदिनाथ म्हणतो, “या चित्रपटात मी पहिल्यांदाच एक निगेटिव्ह भूमिका करतो आहे. पण तरीही माझं पात्र हा ट्रॅडिशनलव्हिलन नाही. तुमच्या आमच्यात मिसळून गेल्यावर वेगळा ओळखता येणार नाही असा हा, सायबर क्राईम चा, चेहरा नसलेला वेगळा व्हिलन आहे. तो कोण आहे हे पटकन कळू शकत नाही म्हणून च तो जास्त भीतीदायक आहे.

पर्ण पेठे म्हणते, “माझी भूमिका तरुण पिढीतल्या बहुसंख्य मुला-मुलींचे प्रतिनिधित्व करते. आजूबाजूची माणसं आपल्याला समजून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही असं वाटणार ही मुलगी व्हर्च्युअल जगात हळूहळू रमत जाते. पण खऱ्या आयुष्यावर जेव्हा त्या सगळ्याचे पडसाद उमटतात त्या वेळी ती खडबडून जागी होते. आणि मग आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय करते ते तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल.”

टॅग्स :सचिन खेडेकरआदिनाथ कोठारेपर्ण पेठे