Join us

सुपरस्टार अंकुश चौधरी बनला गायक, 'पी.एस.आय. अर्जुन'मधील गाण्याला नकाश अजीजसोबत दिला स्वरसाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:54 IST

Ankush Chaudhary : सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता तो प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे.

सुपरस्टार अंकुश चौधरी(Ankush Chaudhary)चा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' (PSI Arjun Movie) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता तो प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या गाण्याला नकाश अजीज यांच्यासोबत अभिनेत्याने स्वरसाज दिला आहे.

या प्रमोशनल  साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्वत्र ट्रेंडिंग ठरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ज्यांनी ‘पुष्पा टायटल साँग’, ‘जबरा फॅन’, ‘क्यूटीपाय’, ‘ स्लो मोशन’ यांसारखे हिट गाण्यांचे गायक नकाश अजीज व अंकुश चौधरीच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला अनिरुद्ध निमकर यांनी कमाल संगीत दिले असून जयदीप मराठे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

संगीतकार म्हणाले...

संगीतकार अनिरुद्ध निमकर म्हणतात, ''धतड ततड धिंगाणा या गाण्याची चाल आणि कॅची संगीतामुळे ते अत्यंत धमाकेदार बनले आहे. या गाण्यातील काही संवाद गाण्याला आणखी आकर्षक बनवतात. आम्हाला वाटले, की जर अंकुश दादांच्या आवाजात हे गाणे सादर झाले तर ते अधिक जबरदस्त होईल आणि प्रेक्षकांना देखील अधिक भावेल. मात्र जेव्हा आम्ही त्यांना विचारले, तेव्हा ते यासाठी तयार नव्हते. त्यांच्या मते, नकाश अजीजसारख्या उत्तम गायकाचा आवाज असताना माझ्या आवाजामुळे गाण्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र माझा आणि नकाशचा हट्ट होता की हे गाणे अंकुश दादांच्या आवाजातच व्हायला हवे. त्यामुळेच आज या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.''

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अंकुश चौधरी