Join us  

सुबोध भावे ‘या’ अभिनेत्रीला करतोय मिस, सोशल मीडियावर शेअर केला Throwback फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 5:18 PM

असाच एक फोटो अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मुक्तछंद' या कार्यक्रमातील हा फोटो आहे. 

सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करतात. याच फोटोद्वारे प्रत्येकजण भूतकाळातील आठवणीत रममाण होतो. असाच एक फोटो अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मुक्तछंद' या कार्यक्रमातील हा फोटो आहे. 

 

या फोटोत तरुणपणीचे सुबोध भावे, अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी पाहायला मिळत आहेत. रसिका उपस्थितांशी संवाद साधत आहे तर सुबोध, श्रेयस आणि अंकुश व्यासपीठावर ते बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहेत. हा जुना फोटो अंकुश आणि श्रेयसला टॅग करत सुबोधने रसिकाला मिस करत असल्याची पोस्टही टाकली आहे. या फोटोला सोशल मीडियावर लाइक्स मिळत आहेत. शिवाय रसिका जोशीचीही रसिकांना नक्कीच आठवण झाली असणार. 

मराठी रंगभूमी, सिनेमा इतकेच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार तसंच कसदार अभिनयाने छाप उमटविणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री रसिका जोशीचे वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी कर्करोगामुळे ७ जुलै २०११ रोजी निधन झाले. 'प्रपंच' ही मालिका, 'खबरदार' हा सिनेमा किंवा 'व्हाईट लिली नाईट रायडर'सारखं नाटक दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीने आपल्या अभिनयाने तमाम रसिकांची मनं जिंकली. मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीने हिंदीतील 'मालामाल विकली', 'गायब', 'ढोल', 'भुलभुलैय्या' या विनोदी सिनेमांसोबत 'एक हसीना थी', 'वास्तुशास्त्र' या गंभीर सिनेमातील भूमिकांचंही सोनं केलं. सुबोधने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सर्व फॅन्सनाही रसिकाची आठवण आली असेल आणि तेही म्हणत असतील रसिका मिस यू….

चित्रपट असो किंवा रंगभूमी, आपल्या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाने आजूबाजूच्या वातावरणात एका वेगळ्याच ऊर्जेची आणि सकारात्मकतेची उधळण करणाऱ्या या अभिनेत्रीची पोकळी कधी भरून निघाली नाही आणि निघणारही नाही हेच सुबोधची ही पोस्ट पाहून लक्षात येतं.

 

टॅग्स :सुबोध भावे