एक संघर्षपूर्ण कॉमेडी 'कट्यार काळजात घुसली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:59 IST
या नाटकाने नुकतेच 100 प्रयोग पूर्ण केले आहेत. आज रविवारी नागपूर येथील देशपांडे सभागृह येथे दुपारी 1 आणि संध्याकाळी ...
एक संघर्षपूर्ण कॉमेडी 'कट्यार काळजात घुसली'
या नाटकाने नुकतेच 100 प्रयोग पूर्ण केले आहेत. आज रविवारी नागपूर येथील देशपांडे सभागृह येथे दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 वाजता असे दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. वडील आणि पाल्याचे नाते हे कधी प्रेमाचे, मैत्रीचे, आपुलकीचे तर कधी कठोर, शिस्तीचे पाहायला मिळते. मात्र, त्यातही वडील आणि मुलगी हे नाते काही वेगळेच असते..सांगता न येण्यासारखेही आणि शब्द अपुरे पडण्याइतकेही. कारण त्या नात्यात एक वेगळाच अर्थ, काळजी, माया सर्वच सामावलेले असते.मात्र, अपवादात्मक स्थितीत वडील-मुलीच्या नात्यात दुरावा आला असेल, तर त्या नात्यातील ओलावा विरून जातो, की ते तितकेच ओथंबलेले असते? अशाच काही नात्यांची ओळख करून देणारे आणि वसंत सबनीस यांच्या लेखणीतून उतरलेले नाटक म्हणजे 'कट्यार काळजात घुसली'. अचानक घर सोडून गेलेल्या वडिलांची १८ वर्षांनंतर भेट होते आणि अशा वेळी वडील आपल्या मुलीला स्वीकारण्यास नकार देतात. मात्र, ती कागदपत्रे दाखवून ओळख पटवून देते आणि इतक्या वर्षांचा राग त्यांच्यासमोर बाहेर काढते. स्वत:च्या मुलीने सुनावलेले खडे बोल त्यांना सहन न होऊनही ते तिला स्वत:च्या घरात राहण्याची परवानगी देतात.यामध्ये त्यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी उडतात, पण ती स्वत:च्या मनाने वागत राहते. कारण ती काही वेगळ्याच उद्देशाने तिथे रहायला आलेली असते. ते प्रयोजन स्पष्ट करताना नाटक कधी कॉमेडी, तर कधी गंभीर स्वरूपात प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या नाटकात वडिलांची भूमिका अभिनेते प्रशांत दामले यांनी, तर मुलीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे.