Join us  

स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना, पाहा तिच्या बाप्पाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 3:12 PM

स्पृहा जोशीने घरात पहिल्यांदाच इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देट्री-गणेशाची प्रतिष्ठापना केल्याबद्दल स्पृहा जोशी सांगते, " दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की, आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची.

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामुळे जर गावी जाता नाही आले, तर ती मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्री गणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.

 

ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना केल्याबद्दल स्पृहा जोशी सांगते, " दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की, आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्री गणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५ व्या दिवशी त्यातून छान रोपटे उभे राहाणार आहे. मला ही कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलंय की, आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून ही नवीन सुरुवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची ही सगळ्यात सुंदर पद्धत आहे."

स्पृहा पुढे सांगते, कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. त्यामुळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशापद्धतीने सुरू करण्याची आता गरज आहे.

स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.  

टॅग्स :स्पृहा जोशीगणेशोत्सव