Join us

महाराष्ट्राचा बहुरंगी बहुढंगी तमाशा!, सोनाली कुलकर्णीचा 'तमाशा लाइव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:37 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आता आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्यातच आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग 'तमाशा लाईव्ह'चे निर्माता आहेत. 

'तमाशा लाईव्ह'विषयी दिग्दर्शक संजय जाधवने सांगितले की,हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरीत चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मात्र आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.

या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, ''संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही आपापल्या विभागात एकदम अव्वल आहेत. संजय जाधव सोबत मी 'अनुराधा' करत आहे तर सोनाली सोबत मी 'हाकामारी' करत आहे आणि आता 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने या दोघांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. संगीतमय चित्रपट आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करत आहोत, त्यामुळे आमची पण उत्सुकता तेवढीच आहे. विषय वेगळा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.'' 

पोस्टरवरून हा चित्रपट संगीतावर आधारित असल्याचे कळतेय. मात्र या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, यासाठी  दिवाळी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसंजय जाधव