Join us  

"मराठीत एकही सुपरस्टार नाही" राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीनेही मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:41 PM

सोनालीने नुकतंच सुपस्टार मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम सिनेमात काम केलं.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या तिच्या साऊथ डेब्यूमुळे चर्चेत आहे. मल्याळम सिनेमा 'मलईकोट्टई वालीबन' मध्ये सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबतच ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. यामुळे सध्या सोनालीचं सगळीकडे कौतुक होतंय. तिने सिनेमातील काही फोटोही शेअर केले तेव्हा तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला. सोनालीने पहिल्याच मल्याळम सिनेमाचा अनुभव शेअर करताना माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी तिने मल्याळम आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील फरक, तसंच राज ठाकरेंचं वक्तव्य यावरही उत्तरं दिली. 

सोनाली कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे. 'अप्सरा आली' गाण्यामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अगदी सुपरस्टार मोहनलाल यांनीही तिला 'अप्सरा आली'मुळे ओळखलं. रत्न मराठी मीडिया युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मल्याळम आणि मराठी सिनेसृष्टीविषयी बोलताना सोनाली म्हणाली, "मल्याळम फिल्मइंडस्ट्री ही मराठीसारखीच आहे. संस्कृती, भाषेबद्दलचा अभिमान, कला या सगळ्या गोष्टींना मराठीसारखंच तिथेही प्राधान्य आहे. पण तिथे मोहनलाल आणि मामुटी हे दोन मोठे सुपरस्टार्स आहेत तसे  आपल्याकडे नाहीत. तिथे प्रेक्षकही पहिलं प्राधान्य मल्याळम सिनेमांना देतात. त्यांच्या भाषेला, संस्कृतीला प्राधान्य देतात. तिथे 600 स्क्रीन्स जिथे फक्त मल्याळम सिनेमे लागतात. आपल्याकडे मराठी सिनेमांसाठी 150 सुद्धा स्वतंत्र स्क्रीन्स नाहीत."

१०० व्या मराठी नाट्यसंमेलनात राज ठाकरेही म्हणाले होते की मराठीत एकही सुपरस्टार नाही फक्त कलाकार आहे. तुझं यावर मत काय असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "नाहीये. खरंच म्हणाले ते. यावर चर्चाही होऊ शकत नाही. पण मी निश्चितच त्यांच्या विधानाशी सहमत आहे."

मराठीमध्ये स्वतंत्र स्क्रीन्स आणि मराठी माणसांनी आपल्या सिनेमांना प्राधान्य देणं या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. सोशल मीडियावर नुसतं कलाकारांना मराठीत बोला असं लिहून चालणार नाही तर तुम्ही चित्रपटही पाहिले पाहिजेत असंही ती म्हणाली. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीराज ठाकरेमराठी चित्रपटमराठी अभिनेता