Join us  

Sonalee Kulkarni : ‘अप्सरे’च्या लग्नाला यायचं हं...! सोनाली कुलकर्णीनं शेअर केली लग्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 10:19 AM

Sonalee Kulkarni Kunal Benodekar wedding : होय, सोनालीनं लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील छापली आहे. तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाचं स्थळ आणि तारीखही ठरली आहे.

सर्वांची लाडकी ‘अप्सरा’ अर्थात सोनाली कुलकर्णीचे (Sonalee Kulkarni) चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, सोनालीने पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला आहे. होय, सोनालीनं लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील छापली आहे. तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाचं स्थळ आणि तारीखही ठरली आहे. खास म्हणजे, सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकरचा (Kunal Benodekar) लग्नसोहळा प्रेक्षकांना याची देही, याची डोळा अनुभवता येणार आहे. 

तुम्हाला ठाऊक आहेच की, पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. दुबईत अगदी चार दोन लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं होतं. पण लॉकडाऊनमुळे अगदी तिचे कुटुंबीय आणि तिचे जवळचे मित्रमैत्रिणी यांना सुद्धा या लग्नात सामील होता आलं नव्हतं. कुठलीही हौसमौज झाली नव्हती. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणजे गेल्या 7 मे रोजी सोनाली व कुणालनं लंडनमध्ये अगदी विधिवत पुन्हा एकदा लग्न केलं होतं.

सातासमुद्रापार झालेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ पाहण्यास चाहते उत्सुक होते.  पण या लग्नाचा एकही फोटो सोनालीनं शेअर केला नव्हता. पण आता सोनाली व कुणालचं हे लग्न प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या लग्नात प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा विवाह सोहळा पाहता येणार आहे.

सोनालीने एक खास व्हिडीओ शेअर करत, याबद्दलची माहिती दिली आहे. या लग्नसोहळ्याचे निमंत्रण तिने प्रेक्षकांना दिलं आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचं प्रक्षेपण केलं जात आहे. ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आले नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. ‘प्लॅनेट मराठी ओटीट’ माझ्या चाहत्यांपर्यंत माझं लग्न पोहोचवत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे, असं सोनालीनं म्हटलं आहे.

सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वºहाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहण्यास उत्सुक असाल तर 11 ऑगस्ट ही आत्ताच तारीख बुक करा. लग्नस्थळ तर तुम्हाला ठाऊक आहेच!!

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी