Join us  

म्हणून आस्ताद काळे म्हणतोय प्रत्येक कलाकारासाठी या दिवसाचे महत्त्व विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 9:47 AM

तिसरी घंटा होताच पडदा उघडतो... रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करत कलाकार नाटकातून आपली अभिनयकला सादर करतो.. सिनेमा म्हणा, मालिका ...

तिसरी घंटा होताच पडदा उघडतो... रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करत कलाकार नाटकातून आपली अभिनयकला सादर करतो.. सिनेमा म्हणा, मालिका म्हणा या माध्यमातून कॅमे-यासमोर टेक रिटेकची संधी कलाकारांना असते..मात्र नाटकात कलाकार विनाटेक रसिकांच्या डोळ्यांच्या कॅमे-यासमोर आपली कला सादर करतो आणि थेट त्यांच्या काळजात स्थान मिळवतो...कुणी निंदा, कुणी वंदा.. मनोरंजन करणं हाच आमचा धंदा असं म्हणत कलाकार रसिकांच्या चेह-यावर आनंद खुलवण्याचं काम करतात...हे सगळं शक्य आहे ते रंगभूमीमुळं.. अशा या रंगभूमी, रंगदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘जागतिक रंगभूमी दिन’...आज ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा होतोय.सीतास्वयंवर या नाटकाने मराठी नाटकांची मुहूर्तमेढ रोवली गेली.. संगीतनाटक, पौराणिक नाटक, दशावतारी नाटक, फार्स, विनोदी अशा विविध रुपात नाटकं रसिकांपुढं येऊ लागली.. एकाहून एक सरस अजरामर कलाकृती सादर होऊ लागल्या.. बालगंधर्वांपासून श्रीराम लागूपर्यंत, मोहन आगाशेंपासून विक्रम गोखलेंपर्यंत, प्रशांत दामलेंपासून ते आजच्या पिढीतील एकाहून एक दिग्गज कलाकार रंगभूमीने दिले.या पडद्यासमोरील कलाकारांसोबत रंगभूमीला समृद्ध करण्यात पडद्यामागील लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचाही खारीचा वाटा...आज प्रत्येक कलाकारासाठी या दिवसाचे महत्त्व विशेष असते.नाटकाप्रती असलेलं प्रेम, आदर, भावना कलाकार हा नेहमीच व्यक्त करत असतो पण या दिवशी विशेष प्रेम शब्दांच्या रुपात व्यक्त करतात.अशाचप्रकारे 'असंभव','वादळवाट','पुढचं पाऊल' आदी लोकप्रिय मालिकेतून आणि सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ मालिकेतून सर्वांचा आवडता अभिनेता असलेला आस्ताद काळे याने ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने सोशल मिडीयावर रंगभूमीसाठी असलेल्या भावना व्यक्त केल्या.“रंगभूमीविषयी मी काही बोलावं,इतकी माझी योग्यता,योगदान नक्कीच नाही.मात्र या माईची सेवा करण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळाली,तेव्हा मी ती प्रमाणिकपणे केली.पुढेही करत राहीन.यामध्ये मला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलेल्या सहकलाकार,निर्माते आणि दिग्दर्शकांचा सिंहाचा वाटा आहेच.त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांचाही.रंगभूमी जिवंत आहे,वाहते आहे ती प्रेक्षकांमुळेच.तर रंगभूमीच्या अशा सर्व सेवकांना,आणि प्रेक्षकांना सलाम.आणि रंगभूमीला त्रिवार वंदन....”,