‘शूSSSSSS बोलायचं नाही’…. अभिनेता अभिजीत चव्हाण असं का म्हणतो आहे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:36 IST
बड्या सेलिब्रिटींपैकी किती जणांनी मुंबईकरांप्रमाणे धक्के खात लोकलने प्रवास केला ही संशोधनाची बाब आहे. त्यामुळेच की एलफिन्स्टन परळ पूल दुर्घटनेबाबत सेलिब्रिटींच्या मोजक्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या मोजक्या प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सा-यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अभिजीत चव्हाणनं एका व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईकरांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. शूSSSSSS बोलायचं नाही अशा शीर्षकाखाली अभिजीत चव्हाणनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘शूSSSSSS बोलायचं नाही’…. अभिनेता अभिजीत चव्हाण असं का म्हणतो आहे ?
एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनं मुंबईकर सुन्न झाले आहेत. दस-याच्या आदल्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेत निष्पाप 23 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे मुंबईकर दुःखात असले तरी तितकाच संताप आणि चीड सरकार तसंच प्रशासनाविरोधात आहे. मात्र या दुर्घटनेत आपण नाहीत असा विचार करुन सारे पुन्हा एकदा आपापल्या कामात बिझी झालेत. नेहमीप्रमाणे मुंबईकरांच्या वृत्तीला मुंबईकरांचं स्पिरीट असं ठेवणीतलं लेबल लावण्यात येत आहे. मात्र मुंबईकरांकडे कोणताही पर्याय नाही. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध झाला आणि अजूनही होत आहे. सामान्यपणे एखादी घटना घडल्यावर सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मुंबईकरांच्या दुःखात सहभागी असल्याचं दाखवून देतात. मात्र बड्या सेलिब्रिटींपैकी किती जणांनी मुंबईकरांप्रमाणे धक्के खात लोकलने प्रवास केला ही संशोधनाची बाब आहे. त्यामुळेच की एलफिन्स्टन परळ पूल दुर्घटनेबाबत सेलिब्रिटींच्या मोजक्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या मोजक्या प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सा-यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अभिजीत चव्हाणनं एका व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईकरांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. शूSSSSSS बोलायचं नाही अशा शीर्षकाखाली अभिजीत चव्हाणनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीतनं या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर समित्या तयार होतील, चौकशी होईल मात्र आपण काही बोलायचं नाही अशा शब्दांत राग व्यक्त केला आहे. यावेळी कोणत्याही गोष्टीचं राजकारण करणा-या नेते मंडळींनाही अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले आहेत. कितीही सहन करावं लागलं तरी काहीच बोलायचं नाही अशा शब्दांत अभिजीतनं या व्हिडीओमधून मुंबईकरांच्या भावना मांडल्या आहेत. या व्हिडीओच्या अखेरीस आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली या सिंहासन सिनेमातील गाण्याच्या ओळी ऐकायला मिळतात. अंगावर काटा आणणारा आणि सुस्त तसंच झोपी गेलेल्या प्रशासनावर कोरडे ओढणारा अभिजीतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या कमेंट्स आणि लाइक्सपेक्षा या व्हिडीओमागची भावना मुंबईकरांपर्यंत पोहचली जावी असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.