Join us

'नाळ भाग २'मधील गोंडस चिमी चर्चेत, असा मिळाला तिला पहिला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 14:47 IST

Naal 2 : एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' (Naal) या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. इवल्याशा गोड 'चैतू'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' (Naal 2)अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. 

‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तिचा तो तोरा बघून अनेक जण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणाले की, ''मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी 'चिमी'ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अनेक ऑडिशन्स आल्या. आमचे एक होते की, शक्यतो नवा चेहरा असावा. कारण आधी काम केलेले बालकलाकार तसे अनुभवी असतात आणि आम्हाला नैसर्गिक अभिनय हवा होता. 

आमच्या टीमने तिची ॲाडिशन घेतली. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडली. म्हणून आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचे निरीक्षण केले आणि आम्हाला आमची 'चिमी' सापडली. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती. त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. इतकी लहान असूनही कधी तिने किरकिर केली नाही. आम्हाला कधी कधी वाटायचे दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना ? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे 'गिव्ह अँड टेक'ही तिने पटकन आत्मसात केले. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. सेटवर त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता, असेही यंकट्टी यांनी सांगितले.

नाळ २ या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :नाळनागराज मंजुळे