Join us

"रीमाताईने नकळत मला साडेतीन लाख रुपये", शरद पोंक्षेंनी सांगितली भावुक आठवण, म्हणाले- "तिने चेक दिला अन्..."

By देवेंद्र जाधव | Updated: May 26, 2025 13:55 IST

अशी माणसं होती म्हणून जगणं छान आहे. शरद पोंक्षेंनी रीमा लागूंची सांगितलेली भावुक आठवण वाचून तुम्हालाही असंच वाटेल

शरद पोंक्षे (sharad ponkshe) दिवंगत अभिनेत्री रीमा लागू (reema lagoo) यांचे खूप छान संबंध होते. शरद पोंक्षेंनी एका मुलाखतीत रीमा लागूंविषयीची भावुक आठवण सांगितली. शरद पोंक्षे म्हणाले, "रीमाताईबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. घट्ट मैत्री होती. एकदा मी झाले मोकळे आभाळ नाटकाच्या तालमीमध्ये उदास बसलो होतो. तेव्हा रीमाताई पाठीमागून आली आणि खांद्यावर हात ठेऊन "बाळा, काय झालं" असं तिने विचारलं.

मी म्हटलं, "काय नाही गं. रोज भाईंदरवरुन लोकल ट्रेनचा प्रवास. थकलोय मी, कंटाळा आलाय." "थोडं पुढे ये ना मग!", असं रीमाताई म्हणाली. "कसं येऊ रीमाताई? पैसे नाहीत. कुठुन, कसा येऊ? माझे आई-वडील आहेत, फॅमिली आहे त्यामुळे तिकडचं घर विकून मी इकडे येऊ शकत नाही. म्हाडाचं घर जरी घ्यायचं झालं ना, तरी तीन-साडेतीन लाख रुपये लागतात. २००० सालची गोष्ट आहे." "होईल रे, काळजी करु नको", असं रीमाताई म्हणाली.

"पुढे आमच्या तालमी सुरु झाल्या. दहा-बारा दिवसांनंतर रीमाताईचा फोन आला. "काय करतोयस, ये की घरी, मस्त जेवण करते, गप्पा मारु.", असं ती म्हणताच मी रीमाताईला भेटायला गेलो. तिची मुलगी होती घरात. तिला कुठेतरी निघायची घाई होती. राजन ताम्हाणे होते, तेही थोड्यावेळाने गेले."

"अरे बाबा, हे सर्व जायची मी वाट बघत होते. तुला पैसे द्यायचे आहेत. आणि मला हे घरच्यांना कळू द्यायचं नाहीय. कालच मी एक जाहिरात केली होती त्याचा चेक आलाय. मी त्यांना म्हटलं चेकवर नाव लिहू नका. मी लिहिते आणि तुला देते. पहिला बोरीवलीत ये राहायला, भाईंदरचा त्रास संपेल तुझा. ते म्हाडाचं म्हणालास ना, तीन-साडेतीन लाख.. ते घर घे. मला नंतर पैसे दे थोडेथोडे." मग त्यांनी मला विलेपार्लेला जाऊन त्यांच्या CA ला भेटायला सांगितलं. "५००० रुपये महिन्याला देणं परवडेल. एखाद्या महिन्यात चुकून जास्त काम मिळालं तर मी एक्स्ट्रा भरेन", असं मी CA ला सांगितलं. पुढे ३ वर्षात दिवसरात्र काम करुन मी ते पैसे फेडले. पैसे फेडायला मी CA कडेच जायचो. 

"सगळ्यात शेवटचा चेक मी रिमाताईंना देणार", असं मी CA ला सांगितलं. तिला काळ्या साड्या खूप आवडायच्या. मी शिवाजी मंदिरला तिचा प्रयोग होता तेव्हा भेटायला गेलो. नाटक संपल्यावर मी तिला आतल्या खोलीत चल, म्हणून सांगितलं. आणि मग काळी साडी आणि चेक दिला. रीमाताईने इतकं जवळ घेतलं मला..." राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पोंक्षेंनी ही खास आठवण सांगितली.

टॅग्स :शरद पोंक्षेरिमा लागूमराठी चित्रपट