शाल्मली टोळ्ये दिसणार चुपके चुपके या हिंदी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 15:25 IST
शाल्मली टोळ्येने दुर्वा या मालिकेत नुकतीच एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ...
शाल्मली टोळ्ये दिसणार चुपके चुपके या हिंदी मालिकेत
शाल्मली टोळ्येने दुर्वा या मालिकेत नुकतीच एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता शाल्मली प्रेक्षकांना एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. शाल्मलीने अनेक वर्षांपूर्वी श्री या हिंदी मालिकेत काम केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून ती हिंदी मालिकांमध्ये झळकलेली नाही. पण आता ती चुपके चुपके या हिंदी मालिकेत काम करणार असून या मालिकेत तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या मालिकेद्वारे जवळजवळ सहा-सात वर्षांनंतर शाल्मली हिंदी मालिकेत पुनरागमन करत आहे. याविषयी शाल्मली सांगते, "एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मराठी मालिका प्रचंड गाजली होती. या मराठी मालिकेवर आधारित चुपके चुपके ही मालिका असून श्रीरंग गोडबोले यांची ही मालिका आहे. या मालिकेत कोणीही खलनायक नाही की सूनेला त्रास देणारी सासू नाहीये. प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडेल अशी ही मालिका असून ही मालिका संपूर्ण कुटुंब एकत्र पाहू शकेन अशी आहे. या मालिकेत मी आणि कुणाल पंडित पती-पत्नीच्या भूमिकेत असून आम्ही दोघे लव्ह बर्डस दाखवलेलो आहोत. आम्हाला दोन मुलं असली तरी आमचे प्रेम पाहाता आमचे आताच लग्न झाले आहे असेच कोणालाही वाटेल. मी श्री या मालिकेत काम केल्यानंतर मराठी इंडस्ट्रीत व्यग्र होते. दुर्वा या मालिकेचा तर मी तीन वर्षं भाग होते. हिंदी मालिका करताना तुम्हाला महिन्यातील 20-25 दिवस द्यावे लागतात. मी मराठी मालिकेत व्यग्र असल्याने हिंदी मालिकांपासून दूर होते. दुर्वा ही मालिका संपल्यानंतर एखाद्या चांगल्या भूमिकेच्या मी शोधात होते. त्याचवेळी मला या मालिकेची ऑफर आल्याने मी ही मालिका स्वीकारली."