Join us

​ छाया का सांगतेय, प्रसिद्धीसाठी अभिनय करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:33 IST

अभिनेत्री छाया कदम यांची दुसरी ओळख म्हणजे सैराटच्या अक्का. सैराट या चित्रपटाने फक्त आर्ची-परशाच नाही तर अनेक कलाकारांचे आयुष्य ...

अभिनेत्री छाया कदम यांची दुसरी ओळख म्हणजे सैराटच्या अक्का. सैराट या चित्रपटाने फक्त आर्ची-परशाच नाही तर अनेक कलाकारांचे आयुष्य बदलवले आहे. आज छाया कदम यांचा दमदार अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळतेय. केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अभिनय करा अ्से छाया कदम यांनी नुकतेच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमा प्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक विषयावर स्वत:चे विचार मांडले.  त्या सांगतात, अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची क्रेझ वाढते आहे, पण तरुणाईने या क्षेत्राकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. सैराट चित्रपटामुळे तरुणाईला चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली, हे खरे आहे. शूटिंगच्या निमित्ताने जिथे जिथे मी जाते तेव्हा अनेक तरुण-तरुणी भेटतात आणि चित्रपट क्षेत्रात येण्याबद्दल इच्छा व्यक्त करतात. काय करू विचारतात. 'अभिनयाची कार्यशाळा करा, नाटकात भाग घ्या' असा सल्ला एके ठिकाणी दिला असता, 'आर्ची आणि परशाने कुठं कार्यशाळेत भाग घेतला होता, त्यांनी कुठं नाटकात काम केलं होतं?' असा मलाच प्रतिप्रश्न करण्यात आला. हा अनुभव सांगून केवळ प्रसिद्धी मिळते म्हणून या क्षेत्राकडे वळू नये, अभिनय क्षेत्राकडे गंभीरपणे पहावे, असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात येण्यासाठी शिकण्याची आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगून त्यांनी स्वत:च्या अभिनय क्षेत्रातील प्रवास उलगडून सांगितला. कबड्डी या खेळाची लहानपणी असलेली आवड, अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात जम बसविण्यासाठी केलेली धडपड, वामन केंद्रे यांच्या झुलवा नाटकात मिळालेली संधी या गोष्टी सांगत त्यांनी आपला झुलवा ते आगामी न्यूड चित्रपटपर्यंत प्रवास अगदी मोकळेपणाने सांगितला.