जवळपास ४० वर्षे आणि ४०० हून अधिक प्रयोग अशा दैदिप्यमान कामगिरीनंतर २०१० मध्ये बंद पडलेले नाटक पुनरुज्जीवित करणे, हे एक आव्हानच. मात्र, ते यशस्वी ठरले आहे. थिएटर ऑलिम्पिक्स २०१८ साठी हे नाटक पुन्हा करण्याची गळ एनएसडीने आळेकरांना घातली. त्याचवेळी विनोद दोशी फेस्टिव्हलनेही हीच विचारणा केल्याने आळेकरांनी त्यांच्या जुन्या कलावंतांच्या संचाला पुन्हा नाटक करता का विचारले. मात्र, आता हे नाटक नव्या तरुण कलाकारांना घेऊन करावे म्हणजे नाटकात एक नवी ऊर्जा मिळू शकेल, असा सल्ला त्यांना देण्यात आला.
आता हे नाटक एनसीपीए प्रेझेंटनशतर्फे सादर होणार आहे. इंग्रजी आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील उच्च आंतरराष्ट्रीय कलात्मक आणि तांत्रिक दर्जाचे रंगमंचीय सादरीकरण करणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचा हा उपक्रम आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या, वैविध्य आणि विविध प्रकारची संस्कृती सादर करणाऱ्या निर्मिती संस्थांना सातत्याने भेट देऊन हा निर्मिती उपक्रम जोपासला जात आहे.
एका मध्यमवर्गीय चाळीतील एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतरच्या घटनांवर हे नाटक आधारित आहे. रडणारी बायको, मृत व्यक्तीच्या मुलाच्या येण्याची वाट पाहणे, इथे तिथे नाक खुपसणारे नातेवाईक आणि शेजारीपाजारी ज्यांच्यासाठी मृत्यू हा फक्त विनोद करण्यासाठीचा आणखी एक प्रसंग आहे अशा अनेक व्यक्तिरेखा यात चितारल्या आहेतच. पण, त्याचबरोबर भारतीय समाजाचा दुटप्पीपणाही यात अधोरेखित होतो.
आळेकर यांची लेखनशैली अत्यंत वेगळी आणि अतुलनीय आहेच. पण, त्या लेखनाला रंगमंचावर दिल्या जाणाऱ्या स्वरुपासाठीही ते प्रसिद्ध आहेत. बुद्धिमान म्हणावा असा विनोद आणि ब्लॅक कॉमेडी यातून या नाटकात मानवी नात्यातील गुंतागुंत आणि भावनिक धाग्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहेच. पण त्याचबरोबर आपली सामाजिक-सांस्कृतिक पद्धत, मानवी स्वभाव, रुढी परंपरा याबाबतीतही हे नाटक ठाम भाष्य करत एक मार्मिक संदेश देते.
या नाटकात संगीताची भूमिकाही महत्त्वाची आहे. संपूर्ण नाटक किर्तन, गोंधळ, भजन, अभंग असे विविध महाराष्ट्रीय लोकसंगीताचे प्रकार वापरून सांगीतिक पद्धतीने सादर केले जाते. खरे तर या नाटकाचे पूनरुज्जीवन या नाटकासाठी मूळ संगीत रचणारे दिवंगत आनंद मोडक (१९५१-२०१४) यांना अर्पण करण्यात आले आहे. त्यांनी याच नाटकापासून संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी दिलेले संगीतच नव्या स्वरुपातील नाटकासाठी वापरले जाणार आहे.
या नाटकाला आताच्या काळाचा असणारा संदर्भ स्पष्ट करताना सतिश आळेकर म्हणाले, "खरं सांगायचं तर मी हाच प्रश्न माझ्या कलाकारांना विचारला होता कारण मलाच त्याची शाश्वती वाटत नव्हती. हे तरुण उच्चवर्गीय उपनगरात आधुनिक जीवनपद्धती जगत आहेत. हे नाटक पुण्यातील ज्या चाळीत घडते तसं त्यांनी काही पाहिलेलंही नाही. या चाळींमध्ये आपले शेजारी हा आपल्या आयुष्याचा भाग असतात. पण, प्रत्यक्ष संदर्भ आणि परिस्थिती बदलली असली तरी मानवजातीच्या सुप्त इच्छा, त्यांच्यातील मूळ स्वभाव हा थोड्याफार फरकाने तोच राहतो, हे मला ठाऊक आहे."
महानिर्वाण हे एक अत्यंत वेगळ्या धाटणीचे नाटक मानले जाते. भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील तो एक मानाचा टप्पा आहे. १९७४ मध्ये झालेल्या पहिल्या प्रयोगापासून पुढे सुमारे ४०० प्रयोगांमध्ये हे नाटक उत्कृष्ट कलाकृतीचा एक नमुना मानले गेले. या नाटकाची मूळ संकल्पना सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीशी इतकी सुसंगत आहे की हे नाटक देशभरातील १० भाषांमध्ये सादर झाले. महानिर्वाण हे विद्यापीठाच्या साहित्य अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले आहे.