Join us  

'सलमान सोसायटी'मधील ह्या गाण्याचे पार पडले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 6:53 PM

'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे नुकतेच चित्रीकरण मुंबईत पार पडले.

ठळक मुद्दे 'पार्टी दणाणली...' गाण्याचे चित्रीकरण पडले पार

'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे नुकतेच चित्रीकरण मुंबईत पार पडले. 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले. 

'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती दशरथ राजेंद्र यादव, रेखा सुरेंद्र जगताप, संपतराव पाटील व शांताराम भोंडवे प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे.सलमान सोसायटी चित्रपटातील 'पार्टी दणाणली' या गाण्याचे शूटिंग नुकतेच निर्माते व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडले. हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे. अमि बैंगने कोरियोग्राफ केले आहे.  या चित्रपटात 'बाळकडू' आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'गावठी' चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्करने या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी' आणि 'टी. टी. एम. एम' चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट 'रईस'मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच 'हाफ टिकिट', 'फास्टर फेणे'सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पावसा'मध्ये भूमिका केल्या आहेत.

'सलमान सोसायटी' या सिनेमातील काही दृश्यांचे चित्रीकरण मुंबईत होणार असून हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  'पार्टी दणाणली' हे गाणे रसिकांना भुरळ पाडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.