गेल्या आठवड्यात दोन बिग बजेट आणि बहुचर्चित सिनेमे रिलीज झाले. ते म्हणजे 'सैयारा' आणि 'येरे येरे पैसा ३'. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु अचानक 'सैयारा' सिनेमाची हवा पसरली. सिनेमा बघणाऱ्या तरुण-तरुणींचे रील व्हायरल झाले. त्यामुळे 'सैयारा' सिनेमालाही फायदा झाला. पण याचा फटका मराठी सिनेमाला बसला आहे. 'सैयारा'मुळे 'येरे येरे पैसा ३'चे शो अनेक थिएटरमधून रद्द करण्यात आले असल्याचं चिन्ह दिसतंय, याबद्दल संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
मराठी सिनेमावर अन्याय, राऊत संतापले
संजय राऊतांनी ट्विटरवर ट्विट करुन लिहिलंय की, "मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत,लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, संयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले, हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र!" संजय राऊतांच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांना समर्थन दिलं आहे. संजय राऊतांनी मराठी सिनेमाची जी बाजू घेतलीय, त्याबद्दल सर्वांनी पाठिंबा दिला आहे.
सैयारा vs येरे येरे पैसा ३
'सैयारा' सिनेमाची सध्या चांगलीच हवा आहे. या सिनेमातून अहान पांडे आणि अनीत पड्डा या कलाकारांनी पहिल्यांदाच बिग बजेट सिनेमात काम केलं होतं. अहान पांडेने या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अहान हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. दुसरीकडे संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' सिनेमाची चर्चा आहे. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.