Join us  

‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 9:35 AM

अभिनयाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करत मराठी, हिंदी सिनेमासह फ्रेंच सिनेमा करणारी श्रिया आता ब्रिटीश सिरीजमध्ये झळकणार आहे.

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर. मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य यातही सचिन पिळगावकर  यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रिअॅलिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' या पदार्पणाच्या सिनेमातून आपल्या वडिलांसह स्क्रीन शेअर रुपेरी पडद्यावर एंट्री मारलेल्या श्रियाने आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवण्यास सुरुवात केली. यानंतर ती किंग खान शाहरुखच्या 'फॅन' या सिनेमातही झळकली. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे.

 

आता श्रिया एका ब्रिटीश टीव्ही सिरीजमध्ये झळकणार आहे. गुरिंदर चढ्ढा यांच्या 'बीचम हाऊस' या सिरीजमध्ये श्रिया काम करत आहे. सध्या या सिरीजचं लंडनमध्ये शुटिंग सुरु आहे. याच शुटिंग दरम्यानचे फोटो श्रियाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसंच लंडनमध्ये विविध ठिकाणांचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या सिरीजच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये बिझी असल्याने श्रिया यंदा गणेशोत्सवाचा आनंदही घेऊ शकली नाही. गणेशोत्सवाचा आनंद मिस करत असल्याची पोस्टसुद्धा श्रियानं सोशल मीडियावर शेअर केली होते.

अभिनयाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करत मराठी, हिंदी सिनेमासह फ्रेंच सिनेमा करणारी श्रिया आता ब्रिटीश सिरीजमध्ये झळकणार आहे. यांत श्रिया चंचल ही व्यक्तीरेखा साकारत असून ती नावाप्रमाणेच चंचल, प्रचंड इच्छाशक्ती असणारी महत्त्वाकांक्षी आणि तितकंच सगळ्यात गोष्टीत कमालीची गुप्तता बाळगणाऱ्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच श्रियाच्या या टीव्ही सिरीजची प्रतीक्षा असेल. या टीव्ही सिरीजसह श्रिया अनुभव सिन्हा यांच्या 'अभी तो पार्टी शुरु हुई है' आणि इतर 2 प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे. 

 

टॅग्स :सचिन पिळगांवकर