Join us

रुपेरी पडद्यावर आता ‘माझ्या बायकोचा प्रियकर',तर अनिकेत विश्वासराव साकारणार ही भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:56 IST

युद्ध- अस्तित्त्वाची लढाई, माय फ्रेंड गणेशा फेम प्रसिद्ध दिग्दर्शक राजीव एस. रुईया लवकरच मराठी रसिकांच्या भेटीला आणखी एक नवी ...

युद्ध- अस्तित्त्वाची लढाई, माय फ्रेंड गणेशा फेम प्रसिद्ध दिग्दर्शक राजीव एस. रुईया लवकरच मराठी रसिकांच्या भेटीला आणखी एक नवी मराठी कलाकृती घेऊन येत आहेत. माझ्या बायकोचा प्रियकर हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर ज्या पद्धतीने माझ्या नव-याची बायको ही मालिका गाजत आहे, तशाच प्रकारे चटकन रसिकांचं ध्यान आकर्षित करणारे असं हे या आगामी मराठी सिनेमाचं शीर्षक आहे. या सिनेमाच्या शीर्षकाच त्याची कथा लपली असल्याचे ध्यानात येईल. शीर्षकावरुन हा सिनेमा विनोदी आणि कौटुंबिक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल असा विश्वास निर्माता आणि दिग्दर्शकांना आहे. मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव याची या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे. अनिकेतसह या सिनेमात भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोगे, पदम सिंग यांच्यासह विविध कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात चार गाणीसुद्धा असतील. या सिनेमाचं बहुतांशी शूटिंग हे भोर आणि मुंबईतील फिल्मसिटीमध्ये पार पडलं. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शन्सचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रदीप शर्मा आणि दीपक रुईया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. माझ्या नव-याची बायको या छोट्या पडद्यावरील मालिकेत गुरुनाथ-राधिका आणि शनाया यांची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळते. अगदी या मालिकेसारखं मिळतंजुळतं शीर्षक असणारा माझ्या बायकोचा प्रियकर या सिनेमात काय वेगळं असणार, याची कथा कशी असेल या उत्सुकता रसिकांना लागली आहे. मालिकेप्रमाणेच माझ्या बायकोचा प्रियकर असं आगळंवेगळं शीर्षक असलेला हा सिनेमा रसिकांवर जादू करण्यात यशस्वी ठरेल अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे.