Join us  

मल्टीस्टारर ‘रॉकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 5:31 PM

‘संदीप साळवे’ या रांगड्या आणि देखण्या अभिनेत्याने ‘रॉकी’ची भूमिका साकारली आहे. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी' चित्रपटातून प्रसिद्ध कलाकारांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देसंदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत

प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित झाला आहे. प्रत्येक कलाकाराचा एक चाहतावर्ग असतो आणि आपल्या आवडत्या कलाकाराने साकारलेली भूमिका बघायला तो आवर्जून चित्रपट बघतो, त्यामुळे विविध कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी' चित्रपटातून प्रसिद्ध कलाकारांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या प्रेमावर आणि कुटुंबावर संकट बनून आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणाऱ्या एका युवकाची कथा 'रॉकी' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘संदीप साळवे’ या रांगड्या आणि देखण्या अभिनेत्याने ‘रॉकी’ची भूमिका साकारली आहे.  'रॉकी' चित्रपटाची प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंटची असून निर्मिती ड्रीम् विव्हर व सेव्हन सीज् प्रोडक्शन्सची आहे. 

या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. ऍक्शन, इमोशन आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, शशिकांत कारेकर, दीप्ती भागवत, या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत आपल्या तडफदार अभिनयाने भूमिकेला न्याय देणारा 'संतोष जुवेकर' पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘रॉकी’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांनी मराठीत काम केले आहे. 

या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू आशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.  अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :राहुल देवक्रांती रेडकरअशोक शिंदे