Join us  

रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 1:39 PM

२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूने पहिलाच चित्रपट सैराटमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटातून एका रात्रीत रिंकू राजगुरूचे नशीब बदलून गेले. तिचा सैराट चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यानंतर आजही रिंकू राजगुरूने या चित्रपटात साकारलेल्या आर्चीने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली आणि हंड्रेड, अनपॉज्ड या हिंदी प्रोजेक्ट झळकली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत म्हटले की, मला माहित आहे की प्रत्येक चित्रपट सैराटसारखा यशस्वी ठरेलच असे नाही. यश आणि अपयशाचा मी माझ्यावर फारसा परिणाम होऊ देत नाही.

२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर स्टार झाले. रिंकू राजगुरूच्या करिअरची सुरूवात चांगली झाली असली तरी तिच्या कागर आणि मेकअप चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जेव्हा रिंकूला विचारण्यात आले की, प्रेक्षकांचे तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत, याचे तुझ्यावर दडपण असते का? त्यावर रिंकू म्हणाली की, मी फक्त चित्रपटाच्या कथेला आणि माझ्या भूमिकेला जास्त महत्त्व देते. मी चित्रपटाच्या भवितव्याचा जास्त विचार करत नाही. कारण त्यासाठी चित्रपटातील सर्वच जबाबदार असतात. मला चांगले माहित आहे की प्रत्येक चित्रपट सैराटसारखा यशस्वी ठरेलच असे नाही. जेव्हा कागर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मी खूप नाराज झाले होते. लोकांना माझा चित्रपट नाही आवडला तर ठीक आहे. यश आणि अपयशाचा मी माझ्यावर फारसा परिणाम होऊ देत नाही. माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या प्रत्येक पात्राला माझे १०० टक्के देणे. प्रेक्षकांनी माझ्या कामाचे कौतुक करावे आणि माझा चांगला परफॉर्मन्स लक्षात ठेवावा, अशी माझी इच्छा आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रिंकू नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच समीर जोशींचा सिनेमा छुमंतर आणि गजेंद्र अहिरे यांच्या पिंगा या चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय ती खुशबू सिन्हा दिग्दर्शित आठवा रंग प्रेमाचा चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत मकरंद देशपांडे आणि विशाल आनंद मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2नागराज मंजुळेअमिताभ बच्चन