Join us

'सैराट' सिनेमाच्या सिक्वलबाबत रिंकू राजगुरूनं सगळंच सांगून टाकलं, म्हणाली "दिग्दर्शकाचा निर्णय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:47 IST

'सैराट २'वर रिंकू राजगुरू म्हणाली...

प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या सैराट या चित्रपटाची जादू आजही तेवढीच आहे. आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरु आणि परश्याची भूमिका करणाऱ्या आकाश ठोसर हे एका रात्रीत स्टार झाले होते. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते. या  केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाला स्वतःची दखल घ्यायला लावली. या चित्रपटावरून प्रेरीत होत ‘धडक’ हा हिंदी चित्रपटही आला. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांनी तर अनेकदा सैराट सिनेमाच्या सिक्वलची मागणी केलीय. नुकतंच रिंकू राजगुरूनं सैराट २ वर भाष्य केलंय. 

नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने सैराट २ वर मौन सोडलं आहे. रिंकू म्हणाली, "मला काहीच माहित नाही. माझ्यापर्यंत तरी काही आलं नाही. शेवटी हा दिग्दर्शकाचा निर्णय आहे. सैराटबद्दल कोणीच काही बोलत नाही. मला असं वाटतं की, खूप पण प्रेम करू नये सिनेमावर. जिथे अर्ध सुटतं आणि ती एक सल राहते, आणखी बघावसं वाटतं. तेच सिनेमाचं यश असतं. कारण, ते कायम जिवंत राहतं आणि हवंहवंसं वाटतं तुम्हाला. त्यामुळे अजून तरी काही बोलणी नाहीयेत".

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतीच ती सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आतापर्यंत रिंकूनं 'झिम्मा २', 'झुंड', 'कागर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची छाप सोडली आहे. रिंकू ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. 

टॅग्स :रिंकू राजगुरूनागराज मंजुळे