वर्दीत दडलेल्या माणसाचा शोध घेणार ‘लाल बत्ती’ सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 15:27 IST
महाराष्ट्र पोलीसांवर प्रचंड ताण असतो. वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना ग्रासलेलं आहे. सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही असा आरोप वेळोवेळी करण्यात येतो. ...
वर्दीत दडलेल्या माणसाचा शोध घेणार ‘लाल बत्ती’ सिनेमा
महाराष्ट्र पोलीसांवर प्रचंड ताण असतो. वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना ग्रासलेलं आहे. सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही असा आरोप वेळोवेळी करण्यात येतो. महाराष्ट्र पोलीसांच्या याच समस्या रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक गिरीश मोहितेने ‘लाल बत्ती’ चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद स्वीकारून पोलीस यंत्रणा समाजाच्या हितासाठी २४ तास झटत असते. या पोलीस यंत्रणेच्या चुका शोधण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘लाल बत्ती’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.नुकताच या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला.‘लाल बत्ती’ हा सिनेमा वर्दीत दडलेल्या माणसाचा शोध घेणारा आहे. पोलीसांचं वैयक्तिक आयुष्य उलगडून दाखवताना त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन ‘लाल बत्ती’ या सिनेमातून रसिकांना घडणार आहे.पोलिसांच्या माणुसकीची गोष्ट सांगणाऱ्या ‘लाल बत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, राधा कुलकर्णी, अनिल गवस, जयेंद्र मोरे, प्रशांत मोहिते, प्रदीप घुले, शैलेश धनावडे, तेजस एस , सुरेश चौधरी आदी कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. साई सिनेमा प्रस्तुत ‘लाल बत्ती’ या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवादलेखन केले आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभणार आहे.लवकरच ‘लाल बत्ती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वीही पोलिसांच्या समस्येचा वेध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ऑन ड्युटी चोवीस तास सिनेमातू केला होता. या सिनेमाचे कथानकही महाराष्ट्र पोलीसांभोवती फिरते.वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात येतो. हाच धागा पकडत सिनेमात पोलिसांच्या समस्यांवर भाष्य करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्याचप्रकारे पोलिसांच्या समस्या रसिकांना रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.मात्र हा सिनेमा पाहाण्यासाठी रसिकांना आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.