पोलिसांच्या कामगिरीचे यथार्थ चित्रण रूपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 14:46 IST
२६/११ आपल्या सर्वांसाठीच काळ्या आठवणीचा दिवस. नऊ वर्षानंतर देखील त्या जखमा भरल्या गेल्या नाहीत. प्रत्येक वर्षी आपण या दिवशी ...
पोलिसांच्या कामगिरीचे यथार्थ चित्रण रूपेरी पडद्यावर
२६/११ आपल्या सर्वांसाठीच काळ्या आठवणीचा दिवस. नऊ वर्षानंतर देखील त्या जखमा भरल्या गेल्या नाहीत. प्रत्येक वर्षी आपण या दिवशी २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहून आपले कर्तव्य बजावतो आणि नंतर पुढे...? याचा विचार केला ईकेसी मोशन पिक्चर्सचे सुमीत पोफळे यांनी. पोफळे यांनी सर्व शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाना भेट देऊन त्यांची आजची खरी परिस्थिती जाणून घेतली. या घटनेकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि या घटनेत पोलिसांनी केलेली सविस्तर कामगिरी “पुन्हा २६/११” (Punha 26/11) या मराठी सिनेमात त्यांनी साकारली.२६ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुमित पोफळे यांनी “पुन्हा २६/११” (Punha 26/11) या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर पोलिसांच्या हस्ते रिलीज केले. यावेळी पुण्याच्या पीआय. रेखा साळुंखे,किरण सोनटक्के, सुनील पवार (पालक-विद्यार्थी संघटना, पुणे अध्यक्ष), सोमनाथ गिरी आणि सार्थी सेवा संघटनेचे राजेश चांदणे, रमेश सुतार, जयश्री देशपांडे, राठी सर, वंसत माझीरे, स्वप्नील दुधाणे आणि असंख्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. सुमीत पोफळे लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात २६/११ आणि पुणे बॉम्ब हल्ला यात पोलिसांनी कशाप्रकारे कामगिरी केली याचे अगदी सविस्तर चित्रण करण्यात आले आहे.विशेष बाब म्हणजे या सिनेमात काम करण्यासाठी कोणत्याही कलाकाराने मानधन घेतलेले नाही. सिनेमाचे सर्व चित्रीकरण वास्तववादी लोकेशन्सवर करण्यात आले.सिनेमा कसा आकाराला आला याबद्दल बोलताना सुमीत पोफळे म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलिसांच्या कुटुंबाला मी जेव्हा भेट दिली तेव्हा मला वास्तव समजले. त्यांची आजची खरी परिस्थिती समजली. म्हणून मी पुन्हा २६/११ या सिनेमावर काम सुरु केले. आजवर सिनेमात एकतर पोलिस भ्रष्ट असतात असेच दाखवले जाते किंवा अशा प्रकारच्या सिनेमात दहशतवाद्यांनी कशा प्रकारे हल्ला केला हेच दाखवले जाते, परंतु मी या सिनेमातून पोलिसांची खरी कामगिरी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की या सिनेमातून पोलिसांची खरोखरची मेहनत मी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना दाखवू शकेल. सिनेमात मिताली पोफळे, केतन पेंडसे, संदीप, नितीन करंजकर, गंगाराम कडुलकर, राजू कांबळे, गोपाळ गायकवाड, संगीता एस. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छायांकन अनक भागवत यांचे आहे. या सिनेमातून खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली देण्याचा माझा प्रयत्न आहे असेही सुमीत पोफळे यांनी व्यक्त केले.