Join us

लालबागची राणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:45 IST

'टपाल' या सिनेमातून आपले  दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

'टपाल' या सिनेमातून आपले  दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  समाजात विशेष समजल्या जाणाऱ्या गतिमंद मुलांचा समाजाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन असतो. या मुलांच्या दृष्टीने दिसणारे जग आपल्याला 'लालबागची राणी' या सिनेमात पाहता येणार आहे. यापूर्वी 'लालबाग परळ', 'टपाल', 'कुटुंब' 'बायोस्कोप' या सिनेमातून आपल्या अभिनयाचं वेगळपण नेहमीच जपणारी वीणा जामकर हिने या सिनेमात लालबागच्या राणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमात वीणा 'संध्या नितीन परुळेकर' या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. लालबागमध्ये राहणारी संध्या सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळे तिला सर्वांनी  'लालबागची राणी' हे नाव दिले.  हिंदी सिनेसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असणा-या लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शनदेखील वाखाण्याजोगेच आहे. 'लालबागची राणी' या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतला आहे. रोहन घुगे यांनी या सिनेमाची कथा,पटकथा तसेच संवाद लिहिले असून रोहित नागभिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. अंजुषा चौगुले, स्वरांजली भरडे, लक्ष्मण उतेकर आणि वैभव देशमुख यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणाऱ्या या सिनेमाचे संकलन देवराव जाधव यांनी केले आहे. दिव्य कुमार, कीर्ती सागठिया, आदर्श शिंदे, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा या गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने सिनेमातल्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. मॅड एंटरटेनमेंट या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे, तर बोनी कपूर हे सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत.या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचे साउंड डिझायनर निहार राजन समल तसेच कोरिओग्राफर अमित बाईंग हे दोघेही हिंदी सिनेसृष्टीतले असून निहार समल यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तर हिंदीतील लॉरेंस डीकुन्हा हे या सिनेमाचे   सिनेमॅटोग्राफर आहेत.   लालबागच्या राणीसोबतच म्हणजेच वीणासोबत या सिनेमात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे या कलाकारांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाकार, तंत्रज्ञ, गायक, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या बाजूने उत्तम असलेला हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.