Join us  

रिल अन् रियल लाईफमधील मायलेक जोडी रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या जोडीबद्दल

By तेजल गावडे | Published: May 05, 2019 6:30 AM

रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे व त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'रंपाट' चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल सांगा?प्रिया बेर्डे : 'रंपाट' चित्रपटात मी अभिनयच्या आईची भूमिका केली आहे. ती दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची बायको असून तिचा नवरा आत्महत्या करतो. ती गरोदर असते. नवऱ्याने आत्महत्या केली असल्यामुळे तिचे आयुष्य उद्धवस्त झालेले असते. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिला सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला जातो. चित्रपट पाहून तुझे मन त्यात रमेल, असे सांगितले जाते. तिला चित्रपट काय हे देखील माहित नसते. ती सिनेमा पाहायला लागते. सिनेमा पाहता पाहता त्यात ती इतकी रममाण होते की स्वतःचे आयुष्यदेखील सिनेमासारखेच जगू पाहते. आपल्या मुलाला हिरो बनवण्याचे स्वप्न पाहू लागते. त्याप्रमाणे ती तिच्या मुलाला घडविते. मुलगादेखील हिरो बनण्याचे स्वप्न पाहू लागतो. आईचे हे स्वप्न पूर्ण करायचे मुलगा मनाशी पक्के करतो आणि मग त्या दृष्टीने त्याचा प्रवास सुरू होतो. या सिनेमात बऱ्याच गमतीजमती पहायला मिळणार आहेत. एक गंभीर बाब हलक्याफुलक्या पद्धतीने रवी जाधवने रुपेरी पडद्यावर मांडली आहे. 

अभिनय बेर्डे : मी मिथुनची भूमिका साकारली आहे. मिथुन हा उत्साही व लक्षवेधी मुलगा आहे. तो अतिशय सिनेमा प्रेमी आहे. सिनेमे पाहत पाहत तो लहानाचा मोठा झाला आहे. त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा मुंबईला येतो आणि अभिनेता होण्यासाठीची त्याची धडपड या चित्रपटात पहायला मिळणार आहे. माझ्यासारखेच अगदी हे पात्र आहे. मीदेखील लहानपणी खूप फिल्मी होतो. सिनेमाप्रेमी होतो. आरशासमोर उभे राहून डायलॉग्ज बोलणे, हे सगळे मीदेखील केले आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका खूप जवळची होती. ही भूमिका करायला मला खूप मजा आली. रवी सरांनी हे पात्र खूप छान रेखाटले आहे. त्यामुळे खूप मजा आली व मजेशीर अनुभव होता. झी स्टुडिओसोबतचा माझा हा दुसरा चित्रपट होता. त्यांच्यासोबत माझे एक वेगळे नाते आहे. मला सिनेइंडस्ट्रीत ब्रेक झी स्टुडिओने दिला होता. त्यामुळे आमच्या सगळ्यांचे खास नाते आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यासोबत काम करायला खूप मजा आली. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. 

या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र काम केले, कसा अनुभव होता?प्रिया बेर्डे : मला आनंद होतो आहे की, मी अभिनयसोबत दुसऱ्यांदा चित्रपटात काम केले. सेटवर आमच्या दोघांचाही अ‍ॅटिट्युड प्रोफेशनल होता. मी त्याच्या कुठल्याही कामात दखल घेत नाही किंवा सेटवर जात नाही. पण, यावेळेस आम्ही एकाच सेटवर होतो. एखाद दुसऱ्या सल्ल्याशिवाय मी त्याच्या कामात अजिबात ढवळाढवळ केली नाही. यश व अपयश दोन्हीला सामोरे जात त्याने अनुभवाने समृद्ध व्हावे, असे मला वाटते. 

अभिनय बेर्डे : आईसोबत काम करायला खूप मजा आली. आईचे पात्र खूप गंमतीदार आहे. तिच्या पात्राचे नाव काळूबाई आहे. त्यात तिने खूप धमाल केली आहे. ज्यावेळी रवी सरांनी मला पहिल्यांदा काळूबाईच्या पात्राबद्दल सांगितले तेव्हा ऐकल्यावर मला हे माझ्या आईसाठी लिहिलेले असल्याचे जाणवले. इतके सुंदर पात्र लिहिले आहे आणि अगदी माझ्या आईसारखेच आहे. आईकडून देखील सेटवर मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. कारण आईने चित्रपटसृष्टीत खूप आणि मोठ्या लोकांसोबत काम केले आहे. तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. खरे तर आम्हाला एकत्र काम करण्यासाठी खूप ऑफर आल्या आहेत. पण रवी सर व झी स्टुडिओसोबत आम्हाला पहिल्यांदा एकत्र काम करायला मिळाले, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कोणते गुण तुम्हाला अभिनयमध्ये दिसतात?प्रिया बेर्डे : अभिनयसोबत काम करताना मला लक्ष्मीकांतचा भास व्हायचा. त्याचे डोळे, केस व हावभाव पाहून काही क्षणाला मला लक्ष्मीकांतची जाणीव व्हायची. लक्ष्मीकांतसोबत मी खूप चित्रपटात काम केले होते. त्यामुळे मला अभिनयला काम करताना पाहताना बऱ्याचदा मला लक्ष्मीकांतचे भास होतात. उभी राहण्याची स्टाईल व कपड्यांचा सेन्स या गोष्टी अभिनयच्या लक्ष्मीकांत सारख्या आहेत. आज लक्ष्मीकांत असते तर त्यांना देखील मुलांना चित्रपटसृष्टीत काम करताना पाहून आनंद झाला असता. त्यांनीदेखील अभिनयसोबत काम केले असते. ते असते तर मुलांचे थोडे वेगळे कौतूक झाले असते. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत सदैव आहेत. आज पंधरा वर्षे झालीत लक्ष्मीकांत यांना जाऊन पण आजही लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कायम आहे.

टॅग्स :रंपाटअभिनय बेर्डेरवी जाधव