Priya Bapat-Umesh Kamat: अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही अनेकांची आवडती जोडी आहे. नाटक, चित्रपट, मालिका यामधून आपला एक फॅन बेस दोघांनीही तयार केला आहे. लग्न झाल्यावर नातं कसं जपावं आणि एकमेकांना कसं समजून घ्यावं याचा एक आदर्शच प्रिया आणि उमेशच्या जोडीने घालून दिलाय. प्रिया केवळ पती उमेशच्या आनंदासाठी मांसाहारी पदार्थ बनवायला शिकली आहे. नुकतंच तिनं याबाबत खुलासा केला. "मी आधी नॉनव्हेजला हातही लावत नव्हते. पण, फक्त उमेशसाठी नॉनव्हेज पदार्थ बनवायला शिकले" असं तिने आवर्जून सांगितलं.
उमेश आणि प्रिया हे सध्या त्यांच्या आगामी 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या पुष्कर श्रोत्रीने प्रियाला विचारलं की, "गेल्या काही वर्षांत उमेशला आवडतील अशा कोणत्या गोष्टी तू शिकलीस?" या प्रश्नावर उत्तर देत प्रिया म्हणाली, "हो मग शिकले ना… त्याला नॉनव्हेज खायला खूप आवडतं आणि त्याने बाहेरचं खाणं जरा कमी करावं, यासाठी मी खास नॉनव्हेज पदार्थ बनवायला शिकले. नाहीतर मी नॉनव्हेज पदार्थांना कधी हातही लावत नव्हते".
पुढे प्रियाने हेही स्पष्ट केलं की, "अर्थात, जेवढे चांगले मी व्हेज पदार्थ बनवू शकते, जे मी घरी रोजच बनवते, तेवढं मी नॉनव्हेज रोज बनवत नाही. पण केवळ उमेशसाठी मी हे शिकले". तिच्या या उत्तराने तिचं उमेशवर असलेलं प्रेम दिसून आलं. प्रियाचं हे उत्तर ऐकून उमेशनेही त्याच्यात झालेल्या एका मोठ्या बदलाविषयी सांगितलं. तो म्हणाला, "आता माझं सांगायचं झालं, तर प्रियामुळे माझ्यात खूप मोठा बदल झाला आहे. तिच्यामुळे मी खूप आवडीने शाकाहारी पदार्थ खाऊ लागलोय. मला आता व्हेज पदार्थ आवडू लागले आहेत". दरम्यान, प्रिया आणि उमेशचा 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.