Join us  

प्रवीण तरडे सांगतायेत, आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला मुलांना विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 4:34 PM

प्रवीण तरडे यांनी गड-किल्ल्यांच्या बाबतीत लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

ठळक मुद्देप्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकच्या अकाऊंटवर त्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले आहे की, मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका...

दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याचसोबत एक खूप चांगली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टचे कौतुक सर्वत्र होत आहे.

प्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकच्या अकाऊंटवर त्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले आहे की, मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा... आजची संध्याकाळ सिंहगडावर...

मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या...

Posted by Pravin Vitthal Tarde on Tuesday, February 2, 2021

प्रवीण तरडे यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या पोस्टला २८ हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत तर ही पोस्ट दोन हजाराहून अधिक लोकांनी शेअर केली आहे आणि एक हजाराहून अधिक लोकांनी या पोस्टवर कमेंट केले आहे. तुमचे कौतुक करावे तितके कमी... तसेच तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत अशा कमेंट प्रवीण यांचे चाहते या पोस्टवर करत आहेत.

प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत तर आई या गृहिणी... मुळशी या तालुक्यात ते लहानाचे मोठे झाले आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते आवर्जून सांगतात. प्रवीण तरडे यांचे शिक्षण पुण्यात झाले असून रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी नोकरी देखील केली आहे. पण नोकरी करणे आपल्याला जमणारे नाही असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. ते लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. 

करिअरच्या सुरुवातीला प्रविण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचं लेखन केले.

टॅग्स :प्रवीण तरडे