Join us  

'अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो?' नेटकऱ्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेंचंही जशास तसं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:08 AM

प्रशांत दामलेंनी नेटकऱ्याला दिलेलं उत्तर ऐकून येईल हसू

प्रशांत दामले (Prashant Damle) म्हणजे नाटकांचे बादशाहच आहेत. या विनोदी अभिनेत्याने आतापर्यंत सिनेमा, नाटकातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि रडवलंही आहे. त्यांची विनोदबुद्धी ही पडद्यावर असो किंवा पडद्यामागे दिसून येतेच. अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. प्रशांत दामलेंचं नाटकावर विशेष प्रेम. आतापर्यंत 12500 पेक्षा जास्त प्रयोग पूर्ण केलेले ते पहिलेच अभिनेते. त्यांचा हा प्रवास पाहून खरोखर अप्रुप वाटतं. अशा या प्रशांत दामलेंची जेव्हा प्रेक्षक थट्टा करतात तेव्हा ते सुद्धा तितकंच मजेशीर उत्तर देतात याचा प्रत्यय नुकताच आला आहे.

प्रशांत दामले सोशल मीडियावर नाटकाचे प्रयोग, वेळा या सर्व गोष्टी पोस्ट करत असतात. त्यांचं नाटक आणि हाऊसफुलचा बोर्ड लागणार नाही असं तर क्वचितच घडेल. आता तर ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही आहेत. नाटकाच्या तिकीटांसाठी त्यांनी 'तिकीटालय' हे स्वतंत्र अॅपही सुरु केलं. यामुळे प्रेक्षकांना तिकीट काढणं सहज शक्य झालंय. नुकतंच त्यांनी आगामी नाटकांची फेसबुक पोस्ट केली. यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, 'सर गंमत म्हणून विचारत आहे, अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो??' यावर प्रशांत दामलेंची तल्लख विनोदबुद्धी जागरुक झाली. त्यांनीही जशास तसं उत्तर देत लिहिलं, 'नाटक पण अर्धच बघता येईल'.

प्रशांत दामलेंच्या या कमेंटवर सगळेच खळखळून हसले. तर एकाने लिहिलं,'सर तुमच्या सारखा महान कलाकार ज्या नाटकात अभिनय करत असेल ते नाटक अर्धवट पाहणं शक्य तरी आहे का??'

प्रशांत दामले सध्या 'सारखंच काहीतरी होतंय' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकांचे प्रयोग करत आहेत. शिवाय 'तू म्हणशील तसं' आणि 'नियम व अटी लागू' या नाटकाचे ते निर्माते आहेत.

टॅग्स :प्रशांत दामलेमराठी अभिनेतानाटकसोशल मीडियाट्रोल